पुणे : राज्याच्या किनारपट्टीलगत असलेला कमी दाबाचा पट्टा कर्नाटककडे सरकल्याने गेल्या तीन ते चार दिवस धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणीच आता हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. पुढील एक-दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्रातही पावसाच्या सरींचा अंदाज आहे.

अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत आठवड्यापासून कमी दाबाचा पट्टा कार्यरत होता. महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीदरम्यान असलेल्या या पट्ट्याची तीव्रता वाढल्यामुळे कोकण आणि पश्चिाम घाटक्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसांत विक्रमी पाऊस झाला. त्यात दरडी कोसळणे आणि भूस्खलन होऊन अनेक नागरिकांचे बळी गेले. कोल्हापूर आणि परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याने हजारो नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. कोकण आणि पश्चिाम महाराष्ट्रात हाहाकार उडवून देणाऱ्या या पावसाचा जोर शुक्रवारी रात्रीपासूनच कमी झाला. त्यामुळे केल्हापूर, साताऱ्यासह पश्चिाम महाराष्ट्रातील बहुतांश भागातील पूरस्थिती गंभीर होण्यापासून रोखली गेली.

महाराष्ट्र किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा आता केरळ ते कर्नाटक किनारपट्टीवर सरकला आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे पुढील काही दिवस उत्तर-दक्षिणेकडील राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार त्याचप्रमाणे उत्तर-पूर्व भागातील राज्यांत पाऊस होणार आहे.

पाऊसभान…

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणीच पुढील चार दिवसांत जोरदार सरी पडतील. मुंबई, ठाण्यासह कोकण विभागात इतरत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाट विभागात आणखी एक दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक आदी भागांत दोन दिवसांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.