‘मोठा पाऊस झाला आणि टँकर घेऊन गेला’ असे म्हणण्याइतपत मोठा पाऊस झाल्याने औरंगाबाद जिल्ह्य़ात सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. सर्वाधिक टँकर असणाऱ्या या जिल्ह्य़ात केवळ कन्नड, खुलताबाद  तालुक्यात टँकर सुरू आहेत. २५० पेक्षा अधिक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. आता तो ३३ वर आला आहे. फुलंब्री, पैठण, गंगापूर, वैजापूर येथील टँकर बंद केले आहेत.
औरंगाबाद तालुक्यातील वडगाव कोल्हाटी भागात ४, सातारा परिसरात ९, देवळाई येथे ३, वाहेगावमध्ये औरंगपूर, पांढरीपिंपरी व मुरुमखेडा येथे प्रत्येकी एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाची झड कायम आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्य़ासह मराठवाडय़ातही टँकरची संख्या झपाटय़ाने घटली. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. विभागातील वार्षिक सरासरीच्या पावसाची टक्केवारीही आता वाढली आहे. औरंगाबाद विभागात ७७९ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित असते. सरासरी ४३.६४ टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. नांदेड जिल्ह्य़ात ३५.३२ आणि परभणी जिल्ह्य़ात ३८.९६ टक्के पाऊस नोंदवला गेला. पाणीसाठय़ातही वाढ झाली आहे. नगर व नाशिक जिल्ह्य़ांत पडलेल्या पावसामुळे जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ झाली. सरासरी उपयुक्त पाणीसाठी २३ टक्क्य़ांवर गेला आहे. सिद्धेश्वर, मांजरा, निम्नतेरणा व सीनाकोळेगाव धरणांत अजूनही शून्य टक्केच पाणीसाठा आहे. माजलगावमध्ये मात्र काहीअंशी पाणी आले आहे. नदी-नाले वाहते झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाल्याने ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे.
गोदावरी लाभक्षेत्रात संततधार; विष्णुपुरी प्रकल्प भरला
वार्ताहर, नांदेड
गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रात संततधार पावसामुळे नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठय़ात वाढ झाली असून हा प्रकल्प पूर्ण भरला. प्रकल्प भरल्याने शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मिटला आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाची वक्रदृष्टी होती. मृगापाठोपाठ हमखास पावसाची नक्षत्रे कोरडीच गेल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठय़ा प्रकल्पांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयाने गेल्या आठवडय़ात तळ गाठला होता. मात्र, अवघ्या ४ दिवसांत गोदावरी लाभक्षेत्रात संततधार पावसामुळे पाणीपातळीत चांगली वाढ झाली. विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरला.
आतापर्यंत एकूण सरासरीच्या ३५ टक्के पाऊस पडला असला, तरी विष्णुपुरी प्रकल्प मात्र जवळपास पूर्णत: भरला. पावसाची संततधार कायम राहिल्यास प्रकल्पाचा एखादा दरवाजा उघडावा लागेल, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या २४ तासांत २५.६८ मिमी पावसाची नोंद झाली. यावर्षी आजपर्यंत सरासरीच्या तुलनेत ३३७.५० मिमी पाऊस झाला. याची टक्केवारी ३५.३२ आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्पच आहे. गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत ८५३.१६ मिमी पाऊस झाला होता.
दुष्काळाचे सावट तूर्त सरले
वार्ताहर, लातूर
जिल्हय़ात गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दुष्काळाचे गडद सावट दूर झाले असून, जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागण्याची शक्यता आहे.
लातूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या मांजरा धरणात आता २१ दशलक्ष घनमीटर पाणी साठल्यामुळे लातूरकर आनंदले आहेत. या धरणाचा अचल साठा ४७ दलघमी असून, अचल साठय़ाच्या निम्मेही पाणी अजून धरणात जमा झालेले नाही. मात्र, यातही किमान दहा दिवसातून एकदा का होईना, प्यावयास पाणी मिळण्याची शक्यता बळावल्याने आनंद व्यक्त होत आहे.
चाकूर तालुक्यातील शेळगाव मंडळात दोन दिवसात तब्बल ३९० मिमी असा विक्रमी, तर उदगीर तालुक्यातील हेरमध्ये २८६ पाऊस झाला. अहमदपूर तालुक्यातील हडोळती मंडळात १२५ मिमी पावसाची नोंद झाली. रेणा नदीच्या बंधाऱ्यात पावसाचे पाणी साठले असून भातखेडा, डोंगरगाव बंधाऱ्यातही पाणी वाढत आहे. लुप्त झालेली तावरजा नदी जिवंत करण्याचे पथदर्शी काम आर्ट ऑफ लिव्हिंगमार्फत झाले. या नदीतही आता हळूहळू पाणी साठते आहे. दररोज पाऊस पडत असल्यामुळे जिल्हय़ाने वार्षकि सरासरीच्या ५० टक्के पावसाचा टप्पा गाठला.
सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये, कंसात आतापर्यंतचा पाऊस – लातूर ७.२५ (३९७.६४), औसा १.७१ (२७८.८२), रेणापूर ३ (३५९), उदगीर १३.४३ (३८२.६७), अहमदपूर २३.६७ (३९७.१९), चाकूर ३.६० (४७७.४), जळकोट २७.५० (३४७.५०), निलंगा ५.२५ (३४३.८४), देवणी ४.६७  (४४२.५१), शिरूर अनंतपाळ निरंक (३८२.७६), सरासरी ९.०१ (३८०.९२).