News Flash

मनसेचा झेंडा बदलणार?; राज्यात नव्या ‘राज’कीय समीकरणांची नांदी

२३ जानेवारी रोजी राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार

राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपावरुन राजकारण सुरु असतानाच आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसंदर्भातील एका बातमी सध्या तुफान चर्चेत आहे. मनसे लवकरच आपला झेंडा बदलण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मागील दोन दिवसांपासून मनसे आपला झेंडा बदलणार असल्याचे वृत्त सोशल मिडियाबरोबर अनेक प्रसारमाध्यमांनी दाखवले आहे. मात्र यासंदर्भात मनसेकडून कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया आलेली नाही.

काय आहे चर्चा?

मिळालेल्या माहितीनुसार २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशानचे आयोजन केलं आहे. त्याचवेळी मनसेची नवीन भूमिका राज स्पष्ट करणार असल्याचे समजते. इतकच नाही तर मनसेचा झेंडा बदलण्याची घोषणाही या महाअधिवेशनात होण्याची शक्यता आहे. मनसेचा सध्याच्या झेंड्यामध्ये निळा, पांढरा, भगवा आणि हिरवा रंग आहे. मात्र आता हा झेंडा बदलून तो पूर्णपणे भगवा किंवा केशरी केला जाणार आहे. यासंदर्भात पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा झाल्याचे समजते.

कसा असेल नवा झेंडा?

पक्षाचा सध्याच्या झेंड्यातील चार रंगाऐवजी नवा झेंडा एकाच रंगाचा असेल. भगव्या किंवा केशरी रंगाच्या या झेंड्यावर राजमुद्राही असेल असे समजते. राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला केवळ एका जागी यश मिळाल्यामुळे मनसे आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणार असल्याची चर्चा आहे. राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक हिंदुत्ववादी पक्षाची उणीव भरुन काढण्याच्या दिशेने राज या विचार करत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सर्वसामावेश’ विचारधारेतून तयार करण्यात आलेल्या मनसेच्या सध्याच्या झेंड्याऐवजी भगव्या झेंड्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते.

हिंदुत्वाचा मुद्दा का?

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी शिवसेनेप्रमाणेच मराठीचा मुद्दा हाती घेतला होता. यामध्ये दुकानांवरील पाट्या मराठीत करण्याचे मनसेचे आंदोलन चांगलेच गाजले होते. मात्र त्यानंतर कोणत्याच निवडणुकांमध्ये मराठीचा मुद्दा तितकासा प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे आता मराठीच्या ऐवजी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्याचा मनसेचा विचार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेच्या मतदारांना या मुद्द्याच्या आधारावर आकर्षित करण्याचा मनसेचा विचार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 10:32 am

Web Title: raj thackeray likely to change mns flag with new all saffron color scsg 91
Next Stories
1 ‘जेएनयू’मधील हल्ल्याचे पडसाद मुंबई-पुण्यात, मध्यरात्री विद्यार्थ्यांची निदर्शने
2 आता वाघाची शेळी झाली
3 कीर्तन महोत्सवात ८३६ मुलींचा नामकरण सोहळा; आंतरराष्ट्रीय नोंद
Just Now!
X