देशात करोनानं शिरकाव केल्यानंतर केंद्र सरकारनं विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउनचं मोठं पाऊल उचललं. त्यानंतर सर्व उद्योग व्यवहार ठप्प झाल्यानं स्थलांतरित मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सर्वच वाहतूक व्यवस्था बंद असल्यानं मजुरांनी पायीच घराकडचा रस्ता पकडला होता. त्यावेळी अभिनेता सोनू सूदनं अनेक स्थलांतरित मजुरांना स्वःखर्चानं घरी पोहोचवलं होतं. त्यामुळे सोनू सूदचं सध्या कौतुक होत असून, राज ठाकरे यांनीही त्याच्या कामाचं कौतुक केलं आहे. मात्र, त्याचबरोबर एक शंकाही उपस्थित केली आहे.

आणखी वाचा- विरोधी पक्षांनी जबाबदारीनं वागायला हवं होतं; राज ठाकरेंनी सुनावलं

राज्यातील करोनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात भाष्य केलं. या कार्यक्रमातच त्यांना अभिनेता सोनू सूदनं केलेल्या कामाविषयी प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी एक शंका उपस्थित केली.

आणखी वाचा- राज ठाकरे म्हणाले, “आताही सांगतो, हे सरकार फार काळ टिकणार नाही, कारण…”

राज ठाकरे म्हणाले, “मला हे कळत नाहीये की, सोनू सूदला हे फायनान्शिअल बॅकिंग (आर्थिक मदत) आलं कुठून? आपल्या थोडसं या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. इच्छा प्रत्येकाच्या असतात. पण, शेवटी आर्थिक बाजू असते. सोनू सूदकडे ही आर्थिक बाजू आली कुठून? सोनू सूद असा फार मोठा कलाकार नाहीये. करतोय हे चांगलं करतोय. केलंही असेल. परंतु हे एकट्या सोनू सूदच डोकं आहे, असं मला वाटत नाही. कालांतराने कळेल आपल्याला यामागे काय काय डोकी होती. आतातरी थांगपत्ता लागत नाहीये,” असं म्हणत राज ठाकरे यांनी आर्थिक स्त्रोतांविषयी शंका उपस्थित केली.

आणखी वाचा- राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच मांडली राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल भूमिका, म्हणाले…

“राम मंदिराचं भूमिपूजन धुमधडाक्यात व्हायला हवं”

ई-भूमिपूजनाच्या प्रश्नावर राज म्हणाले,”म्हणूनच म्हणालो यात दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मंदिर उभं राहिलं पाहिजे. आताच्या परिस्थितीत याचं भूमिपूजन व्हायला हवं का? तर मला वाटत आता ती वेळ नाही. लोक आता एका वेगळ्या विवंचनेत आहेत. काय आहे, भूमिपूजन होईल, एका दिवसाची बातमी होईल, एका दिवसाच्या चर्चा होतील. पण, यापलीकडे कोणीच त्या मानसिकतेत नाही. झालं आनंद आहे. खरं उभं राहिलं त्यावेळी जास्त आनंद होईल. मला आता कल्पना नाही, त्यांनी आता का ठरवलं. राम मंदिराचं भूमिपूजन धुमधडाक्यात व्हायला पाहिजे. आता गरज नाही. दोन महिन्यांनी झालं असतं तरी चाललं असतं. कारण सगळं स्थिरस्थावर झालं असतं तर लोकांना आनंद घेता आला असता,” असं राज ठाकरे म्हणाले.