दिल्लीतील निजामुद्दीन प्रकरणाशी संबंधित येथील तबलिगी जमातीच्या पाच जणांसह त्यांच्या संपर्कातील १० अशा एकूण १५ पैकी १४ संशयितांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. यातील एकाचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी दिली.

निजामुद्दीन येथील तबलिगी जमातीच्या परिषदेस धुळे जिल्ह्य़ातीलही काही जण उपस्थित होते. त्यापैकी तीन जणांना निजामपूर, तर दोघांना धुळे शहरात शोधण्यात आले. अन्य १० जण संबंधितांच्या संपर्कात आले होते. अशा सर्व १५ लोकांची हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यलयात तपासणी करण्यात आली. त्यातील १४ लोकांचे अहवाल नकारात्मक आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, दिल्लीतील निजामुद्दीनहून परतलेले काही जण माहिती लपवीत शहरात राहत असून त्यांना शोधून त्यांच्यासह कुटुंबीयांना तसेच संपर्कात आलेल्या लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. जुने धुळ्यातील खुनी मशीदजवळ राहणारा एक तरुण १० ते १८ मार्च या कालावधीत दिल्लीला जाऊन आल्याची माहिती शुक्रवारी आझादनगर पोलीस ठाणे तसेच महापालिका आरोग्य विभागाला मिळाली. पोलिसांनी तो संपूर्ण परिसर बंदिस्त केला आहे. मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी यांनी संबंधित तरुणासह त्याचे आईवडील, दोन भाऊ, बहीण, आजी यांना जिल्हा रुग्णालयात नेले. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. महापालिकेच्या पथकाने संपूर्ण परिसर, त्या कुटुंबाचे घर र्निजतुक केले.

गिरीश महाजनांकडून भाजपच्या उपक्रमाची पाहणी

धुळे शहर भाजप महानगरच्या वतीने गरजूंसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मेरा परिवार भाजप परिवार’ उपक्रमाची पाहणी करीत आमदार गिरीश महाजन यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना मदतीची ग्वाही दिली. भाजपच्या वतीने शहरातील गरजूंसाठी मध्यवर्ती किचन सुरू केले आहे. अग्रवाल भवनातून दररोज दोन वेळचे २० हजार जेवणाचे डबे तयार करण्यात येऊन ते गरिबांना वाटण्यात येत आहेत.

महाजन यांनी अग्रवाल भवन येथे भेट देऊन भोजन व्यवस्थेची पाहणी केली. हा उपक्रम राबविताना सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायजरचा उपयोग करणे, मास्क वापरणे आदी महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

विनाकारण फिरणाऱ्यांवर आता ‘एसआरपी’ची देखरेख

टाळेबंदी असतानाही शहरासह जिल्ह्य़ात विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी जालना येथून राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपी) दोन तुकडय़ा दाखल झाल्या असून त्यांनी आपले काम सुरू केले आहे. देवपूर, आझादनगर, चाळीसगांव रोड पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे, तसेच शिरपूर येथे या जवानांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. देवपूरकडे जाणाऱ्या छोटय़ा पुलावर जमलेल्या अनेकांना जवानांनी लाठीचा प्रसाद दिला. अनेक जण डॉक्टरांकडे जात असल्याचे कारणे देत होते.