दुष्काळग्रस्तांसंबंधी अत्यंत वादग्रस्त विधाने करून अडचणीत आलेल्या अजित पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय पक्षाच्या आमदारांशी चर्चा करूनच घेतला जाईल, असे गुरुवारी फलटण येथे सूचित केले. मागच्या वेळी राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय वैयक्तिकरीत्या घेण्यात आला होता, परंतु ज्या आमदारांनी मला नेतेपदी निवडले आहे, त्यांच्याशी सल्लामसलत केल्याखेरीज यावेळी राजीनामा देणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नुकसान होऊनही पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अद्यापही मौन बाळगणे पसंत केले आहे.
गेल्या रविवारी इंदापूर येथे तीव्र पाणीटंचाईप्रश्नी दुष्काळग्रस्तांना भेडसावणाऱ्या समस्यांवर आक्षेपार्ह विधाने करून अजित पवार हे कमालीचे अडचणीत आले. राज्यात आणि विधिमंडळातही त्यांच्या वक्तव्यांचे तीव्र पडसाद उमटून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची एकमुखी मागणी केली. त्यानंतर लगेचच पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितल्यावरही  शिवसेना-भाजप युती तसेच मनसेनेही गेले तीन दिवस अजित पवार यांच्यावर जोरदार टीकेच्या तोफा डागल्या आहेत. या प्रश्नावरून विरोधकांनी विधिमंडळाचे कामकाजही रोखून धरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त करावी आणि अजित पवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी एकमुखी मागणी विरोधकांनी केली होती. विरोधकांच्या या मागणीबद्दल अजित पवार यांना येथे विचारण्यात आले असता त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. असे विधान करून मी आपल्या राजकीय आयुष्यातील मोठी घोडचूक केल्याचे अजित पवार यांनी नमूद केल्यानंतरही त्यांच्यावरील टीकेची धार कमी झालेली नाही.
अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर शरद पवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून माफी मागितल्याची चर्चा होती. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पवारांनी माफी मागून वादावर पडदा टाकण्याची भूमिका घेतली होती. पण पक्षाध्यक्षांनी माफी मागू नये, अशी खंबीर भूमिका अजित पवारांनी घेतली. मग शरद पवार यांनी माफी मागितलेली नाही. ट्वीटरवरील त्यांनी तसे काही नमूद केलेले नाही, असा खुलासा नंतर करण्यात आला. विरोधकांनी हा विषय वाढविल्याने मुख्यमंत्र्यांना दिलगिरी व्यक्त करू द्यावी म्हणजे विषय संपेल, असा सल्ला पक्षनेतृत्वाने अजित पवारांना दिल्याचे कळते.
माणिकरावांमुळे मुख्यमंत्री अडचणीत
अजित पवार यांच्या वक्तव्यावरून खेद व्यक्त करण्याची मुख्यमंत्री चव्हाण यांनी तयारी दर्शविली असली तरी पवार यांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त करू नये, अशी भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी घेतल्याने आता मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेशाध्यक्ष अशा नव्या वादाची किनार निर्माण झाली आहे. या वक्तव्यामुळे अजित पवार यांचा राजकीय आलेख घसरणीला लागल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, लोकांची स्मरणशक्ती कमी असते. त्यामुळे पुढील निवडणुकीत हा विषय तापदायक ठरेल की नाही, याचा आताच अंदाज वर्तविता येणार नाही, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येते.