News Flash

‘अजित पवार मुख्यमंत्री असते, तर परिस्थिती वेगळी असती का?’; रोहित पवारांनी दिलं उत्तर

'राज्याचं स्टेअरिंग अजित पवारांच्या हाती असल्याचं मान्य आहे का?'; रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवार यांनी लोकसत्ता डॉट कॉमला मुलाखत दिली.

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. मात्र, तरीही सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असल्याचं आणि अजित पवारांकडेच राज्याची सूत्रं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात व गप्पांच्या फडांमध्ये सातत्याने होत असते. लोकांच्या औत्सुक्याच्या या मुद्द्यावरूनच ‘राज्याचं स्टेअरिंग टेक्निकली अजित पवारांच्या हाती असल्याचं मान्य आहे का? आणि ‘अजित पवार मुख्यमंत्री असते, तर परिस्थिती वेगळी दिसली असती का?’, असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना विचारण्यात आला. त्यावर रोहित पवार यांनी भूमिका मांडली.

आमदार रोहित पवार यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी करोना स्थिती, राज्यातील राजकारणात चर्चेत असलेल्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी राज्याची सूत्रं अजित पवारांकडेच असल्याची चर्चा होत असते, त्याबद्दल त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले,”जेव्हा रिसोर्सेस कमी होतात म्हणजे आता केंद्राने एखादी सरकारी कंपनी विकली, तर पैसे येतात. आरबीआयला सांगितलं, लाखभर कोटी रुपये येतात. केंद्राने कर्ज घेण्याचा निर्णय घेतला की त्यांना लगेच कर्ज मिळतं. अशा परिस्थितीत राज्याकडे पैसाच येत नसेल. जेव्हा जीएसटी लागू करण्यात आला, तेव्हा तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं होतं की, कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. जीएसटीची भरपाई आम्ही भरून काढू असं ते म्हणाले होते. त्यानंतर जीएसटी कर प्रणाली स्वीकारली गेली. आता आपल्याला ९० हजार कोटी रुपये कमी पडले. तेव्हा केंद्राने दिले का पैसे? नाही दिले. देशाच्या एकूण जीएसटीपैकी २० टक्के जीएसटी महाराष्ट्रातून जातो. काही मदत आली तर सहा टक्के महाराष्ट्राला येते. अशा परिस्थितीत जेव्हा पैसे कमी पडतात, आहे त्या परिस्थिती राज्य चालवायचं असते, तेव्हा सर्व जबाबदारी अर्थमंत्र्यांवर येते. अर्थमंत्री आज कोण आहेत?,” असं रोहित पवार म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “अडचणीच्या काळात राज्याकडे पैसा कमी असतो आणि करोनासारख्या अडचणीतून राज्याला बाहेर काढण्यासाठी जो पैसा लागतो, तो अर्थमंत्री देतात. करोनासारख्या परिस्थिती अर्थ खात्याची जबाबदारी असणारा व्यक्ती महत्त्वाचा व्यक्ती बनतो. मग काही काम करायचं असेल, तर आपल्याला जावंच लागतं. काळच तसा आहे,” असं रोहित पवार म्हणाले. ‘अजित पवार मुख्यमंत्री असते, तर परिस्थिती वेगळी दिसली असती का?’, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर रोहित पवार म्हणाले,”करोना कसा वाढतोय? कुणाचं त्यावर नियंत्रण नाही. आज मुख्यमंत्री हा विषय नाही, तर एकजूट राहणं महत्त्वाचं आहे. भाजपाचं सरकार जेव्हा होतं, तेव्हा तुम्ही साताऱ्याला जा, कोल्हापूरला जा… तेव्हाची पूरपरिस्थिती होती, तेव्हा आधीच्या सरकार कसं वागलं ते बघा. पूरपरिस्थिती आटोक्यात आणता आली नाही. आता महाविकास आघाडी सरकार आहे. शरद पवारांचं मार्गदर्शन आहे. सोनिया गांधी यांचं मार्गदर्शन आहे. जग गुडघ्यावर आलंय, पण आपलं राज्य बाहेर निघतंय,” असं रोहित पवार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 11:35 am

Web Title: rohit pawar exclusive interview ajit pawar uddhav thackeray maharashtra cm bmh 90
Next Stories
1 “राज्याच्या हिताचे प्रश्न केंद्राकडे मांडण्यात विरोधी पक्ष कमी पडला”, रोहित पवारांनी भाजपाला सुनावले!
2 पार्थच्या बोलण्याला कवडीची किंमत नाही असं पवारांनी म्हटल्यानंतर घरी काय वातावरण होतं?; रोहित म्हणतात…
3 पार्थ यांचा पराभव आणि मोदी कनेक्शन : रोहित पवार म्हणतात, “तो पराभव कुटुंबासाठी धक्का होता पण…”
Just Now!
X