सत्ताधारी खासदारांचा भाजपला घरचा आहेर
गडगडलेले कांदा भाव रोखण्यासाठी त्याचे किमान निर्यात शुल्क कमी करावे, अशी मागणी खा. हरिश्चंद्र चव्हाण आणि खा. हेमंत गोडसे यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे केली. या संदर्भात तातडीने निर्णय न घेतल्यास उत्पादकांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नसल्याकडे खुद्द सत्ताधारी खासदारांनी लक्ष वेधले आहे.
कांदा निर्यात मूल्य ७०० डॉलर असल्याने सध्या त्याची निर्यात पूर्णपणे बंद आहे. लाल कांद्याची आवक वाढत असल्याने भावात कमालीची घसरण सुरू आहे. मागील पंधरा दिवसात कांद्याचे भाव दीड हजार रुपयांनी कमी झाले. देशात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन नाशिक जिल्’ाात घेतले जाते. चांगल्या प्रतवारीमुळे हाच कांदा सर्वाधिक निर्यात होतो. पुढील काही दिवसात घाऊक बाजारात मोठय़ा प्रमाणात कांदा येणार आहे. या कांद्याची साठवणूक करता येत नसल्याने तो विक्री करणे उत्पादकांना भाग पडते. सध्या मिळणारे दर लक्षात घेतल्यास त्यातून उत्पादन खर्चही भरून निघणे अवघड आहे. केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात मूल्य कमी न केल्यास देशांतर्गत मागणीपेक्षा अधिक कांदा शिल्लक राहून भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे. या संदर्भात खा. चव्हाण यांनी लोकसभेत शून्य प्रहरात हा प्रश्न उपस्थित केला. पण, काँग्रेस सदस्यांच्या गोंधळामुळे तो चर्चेला आला नाही. यामुळे खा. चव्हाण व गोडसे यांनी वाणिज्य मंत्र्यांची भेट घेऊन किमान निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी केली. या संदर्भात तातडीने निर्णय न घेतल्यास कांदा उत्पादकांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नसल्याचे खासदारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.