11 December 2017

News Flash

शेट्टींना आव्हान देण्यासाठी सदाभाऊंचा ‘बहुजन’ प्रयोग!

संघटनेच्या स्थापनेनंतर खोत यांनी उसाचा दर मीच जाहीर करणार अशी घोषणाही केली आहे.

दिगंबर शिंदे | Updated: September 23, 2017 3:01 AM

कोल्हापूर येथे आयोजित मेळाव्यात गुरुवारी सदाभाऊ खोत यांनी नव्या शेतकरी संघटनेची घोषणा केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना आव्हान देताना सदाभाऊ खोत यांनी नवी चूल मांडली असली तरी आपला प्रयोग यशस्वी व्हावा म्हणून सदाभाऊंनी बहुजन मानसिकतेचा आधार घेतला आहे. शेट्टी लिंगायत जैन समाजाचे असल्याने मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आपल्याबरोबर यावे, असा अप्रत्यक्ष प्रयत्न खोत यांचा राहणार आहे.

राज्यमंत्री खोत यांनी स्वाभिमानीचे नेते खा. राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून ही संघटना वाढविली. मात्र सत्तेची सावली मिळताच खोत यांच्याबद्दल निर्माण झालेली असूया हीच मतभेदाला कारणीभूत ठरली हे उघड गुपित आहे. वारणा, कृष्णा, पंचगंगा या नद्यांच्या खोऱ्यात प्रामुख्याने बारमाही बागायतीची राने. या रानात उसाची शेती इथल्या साखर कारखानदारीमुळे बहराला आली.

उसाचा दर कसा हवा ते ऊस कसा परवडत नाही असे सांगणारे वर्षांला चार दोन काकरी उसाच्या लावणीत वाढच करीत होते. दराचा प्रश्न उपस्थित करून चार पैसे जादा पैसे मिळाले तर कोणाला नको होतील. यातूनच नगदी पिकासाठी आंदोलनाला हवा मिळत गेली अन् संघटनेची शक्ती वाढत गेली. याला सहकारातील खाबुगिरीही तेवढीच कारणीभूत ठरली. कारखान्याचा संचालक झाला की, वर्षांत एखादी जीपगाडी दारात दिसायला लागली. यातूनही असूया निर्माण होत गेली. मग सत्तेच्या राजकारणाला गावगप्पातून हादरे देता येतात, सत्ता मिळविता येते हे शेट्टी यांच्या पंचायत समिती ते खासदार व्हाया आमदार हा प्रवास काल-परवाचा.

ऊस पट्टय़ातील बहुसंख्य शेतकरी हा विशिष्ट समाजाचा आहे. याला दूध व्यवसायाची जोडही लाभली आहे. मात्र बहुजन वर्ग हा आजही चाचपडत आहे. नेमक्या याच स्थितीचा लाभ घेत सदाभाऊ आपली नवीन संघटना घेऊन या भागात स्थिरावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या मदतीला साखर कारखानदारी नसली तरी शासन यंत्रणेतील ताकद आणि सुनियोजित राजकारण करणारा भाजपा पाठीशी आहे.

नव्या संघटनेचे नाव ठेवत असतानाच रयत क्रांती संघटना असे घेतले आहे. यातील क्रांती हा शब्द अलीकडच्या काळात निघालेल्या लाखोंच्या मोर्चातून घेतला असावा तर रयत हा बहुजन वाचक शब्द असल्याचा भास होत आहे. आता ३० सप्टेंबरला इचलकरंजीत मेळावा निश्चित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या रूपाने इचलकरंजीमध्येच शेट्टी यांच्या बालेकिल्ल्यात बस्तान बसविण्याचा हा प्रयत्न आहे.

खासदार शेट्टी यांच्याकडून दुखावल्या गेलेल्या गटाला जवळ करण्याचा आणि संघटनेत स्थान देऊन प्रतिष्ठेबरोबरच सत्तेची संधी देण्याचा प्रयत्न सदाभाऊंचा राहील. संघटनेच्या स्थापनेनंतर खोत यांनी उसाचा दर मीच जाहीर करणार अशी घोषणाही केली आहे. यामुळे ऊस उत्पादक आपल्याकडे खेचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आतापर्यंत रस्त्यावर चालणारा संघर्ष आता काही अंशी बौद्धिक पातळीवरही करावा लागणार आहे. या संघटनेला राजाश्रय मात्र जन्मापासून मिळणार असला तरी नकारात्मक बाबीमधून मिळणारी ताकद कशी मिळविणार, हा प्रश्न मात्र या नव्या संघटनेपुढे कायम राहण्याची चिन्हे आहेत.

 

First Published on September 23, 2017 3:01 am

Web Title: sadabhau khot try to bring maratha community close to challenge mp raju shetty
टॅग Sadabhau Khot