करोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. करोना हा रोग नसून, करोनाने मरणारी लोकं जगण्याच्या लायकीची नाहीत असं ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी करोना निर्बंधावरुनही टीका केली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

“मुळात करोना हा रोग नाही. करोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. करोना हा रोग नाही. हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही,” असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी निर्बंधांवरुन टीका करताना म्हटलं की, “दारुची दुकानं उघडी…त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला आहे त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे, लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असले हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही”.

पुढे ते म्हणाले की, “मी काही राजकीय माणूस नाही. पण माझ्यासारखी असंख्य लोक संपूर्ण देशात अस्वस्थ आहेत. हा मूर्खपणा सुरु आहे. करोना हा रोगच नाही. हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही,” असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे”.

“करोनाच्या नावाखाली खेळखंडोबा सुरु आहे. केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार जबाबदार आहे. जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील. लष्कराला काय मास्क लावून लढायला सांगणार आहोत का?,” अशी विचारणा संभाजी भिडे यांनी केली. “करोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांचा आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे. नोटेवरचे गांधी आदर्श मानून कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील,” असंही ते म्हणाले.

“करोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे. प्रत्येकाला जीवाची काळजी आहे, तो घेईल , सरकारने यात लक्ष घालू नये. सरकारने पारदर्शक कारभार करावा, व्यसने वाढवायचे गांजा, मटका अफू सगळे मोकाट, पण तालमी, मैदान बंद. करोना अस्तित्वात नाही. लॉकडाउनची गरज नाही. सरकारने काही कारू नये. ज्याला-त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावे,” असंही ते म्हणाले.

“कोणत्या शहाण्याने जगाच्या पाठीवर मास्क लावण्याचा हा नालायक सिद्धांत काढला आहे. मास्क लावण्याची काही गरज नाही. मास्क नसेल तर पोलीस काठ मारतात. हा सगळा मूर्खपणा आहे”, असंही संभाजी भिडे म्हणाले.

…अन् संभाजी भिडेंनी शिवसेना आमदाराला काढायला लावला मास्क
संभाजी भिडे यांनी याआधी एका कार्यक्रमात चक्क आमदारालाच मास्क काढायला लावला होता. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात संभाजी भिडे उपस्थित होते. यावेळी संभाजी भिडे यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना उद्धाटनाआधी तोंडावरील मास्क काढायला लावला. करोना होत नाही मास्क काढा असं सांगितल्यावर बाबर यांनीदेखील मास्क काढून टाकला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संभाजी भिडे यांनी फक्त आमदारच नाही तर तिथे उपस्थित आणखी एका व्यक्तीलाही मास्क काढायला सांगितला. त्यानंतरच अनिल बाबर यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आलं.