संस्था निर्माण करणे सोपे असते मात्र त्या संस्थांच्या कामात सातत्य राखणे कठीण असते, साने गुरुजींनी ऐक्य व मानवता धर्माचा संदेश दिला आहे हा संदेश घेऊन राष्ट्रीय ऐक्याचे काम करणारी पिढी घडवण्याचे अखंड काम साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातून झाले पाहिजे असे विचार केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले आहे.
   माणगाव तालुक्यातील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. आपण इमारती बांधू शकतो, विचार मांडू शकतो; पण त्यात सातत्य किती ठेवतो यावर संस्थेचे भवितव्य अवलंबून असते. विचारी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली तर ते कठीण नाही. साने गुरुजींना सामाजिक परिवर्तनासाठी घरातूनच संघर्ष करावा लागला. साने गुरुजींनी उत्तम साहित्य सहज भाषेत लिहून नव्या पिढीला प्रेरणा दिली, एवढेच नव्हेतर इतर भाषेतील चांगले विचार मराठीत कसे येतील यासाठी प्रयत्न केले. त्यामागे ऐक्य आणि मानवता धर्म हे मूल्य होते. गुरुजींच्या ऐक्याचा विचार तरुण पिढीमध्ये रुजवून नवी पिढी घडवण्याचे आव्हान आपल्या समोर असल्याची आठवण पवार यांनी करून दिली.
साने गुरुजी स्मारकाकडे भरपूर जमीन आहे. त्यातील काही १२ एकर जमिनीवर राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीने फळबाग लागवड केली तर स्मारकासाठी येत्या तीनचार वर्षांत उत्पन्नाचे चांगले साधन निर्माण होईल आणि कोणाचीही मदत न घेता साने गुरुजींच्या विचारांचा वारसा पुढे सुरू ठेवण्याचे कार्य अखंडपणे सुरू राहील, असेही शरद पवार म्हणाले.
   अध्यक्षस्थानावरून बोलताना स्मारक समितीचे अध्यक्ष युवराज मोहिते यांनी या स्मारकाच्या उभारणी मागची संकल्पना विशद केली. पहिल्या टप्प्यात गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांकडून गोळा करण्यात आलेल्या वर्गणीतून स्मारकाची ३६ एकर जागा विकत घेण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मिळालेल्या तीन कोटी १४ लाख रुपयांच्या निधीतून साने गुरुजी भवन, आंतर भारती भवन व युवा भवनाची उभारणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
   या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, आंतर भारती भाषा केंद्राच्या अध्यक्षा पुष्पा भावे, ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके, राज्याचे ग्राम विकासमंत्री जयंत पाटील, रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना साने गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, जिल्हाधिकारी एच के जावळे, पोलीस अधीक्षक अंकुश िशदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ, गजानन खातू, सुधाताई बोराड, सुधीर देसाई, वडघरचे सरपंच जगदीश भोकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसिद्ध कवी व अभिनेते किशोर कदम यांनी केले.
शरद पवारांनी निराशा केली
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी ते स्मारकासाठी भरीव निधीची घोषणा करतील अशी अपेक्षा स्मारक समितीने बाळगली होती. मात्र पवार यांनी फळबाग विकसित करा, असा सल्ला देऊन समितीची बोळवण केली. त्यामुळे स्मारक समितीच्या पदरी पुरती निराशा आली. यावर बाबा आढाव यांनी नाराजी व्यक्त केली. फळबागांचा मळा फुलवण्या ऐवजी या स्मारकातून विचारांचा मळा फुलवायला हवा, असे स्पष्टीकरण त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. राज्य सरकारचे दोन वरिष्ठ मंत्री यावेळी उपस्थित असतानाही कोणत्याही प्रकारची आíथक मदतीची घोषणा करण्यात आली नाही. शासनाच्या तीन कोटींच्या निधीतून स्मारकाचे काम पूर्ण होणे शक्य नव्हते लोकांनी लावलेल्या हातभारामुळे स्मारकाचे काम पूर्ण झाले असल्याचे स्मारक समितीचे अध्यक्ष युवराज मोहिते यांनी स्पष्ट केले