राज्याच्या राजकारणात मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरूद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शाब्दिक सामना बघायला मिळाला. मंदिरं खुली करण्यासंदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वावरून डिवचलं असून, त्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. चीनचं सैन्य लडाखमधील घुसखोरीचा हवाला देत राऊत यांनी टोला लगावला असून, “राज्यपालांनी सरकार घटनेनुसार चाललं की नाही, हे पाहायचं असतं,” असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

आणखी वाचा- बार सुरू झाले, देव कुलुपबंद का?; राज्यपाल कोश्यारींचा ठाकरे सरकारला सवाल

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाच्या मुद्यावरून डिवचत मंदिरं खुली करण्याची मागणी केली. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना उत्तर दिलं. राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही निशाणा साधला आहे. “महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे या राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. हे राज्य घटनेनुसार चालतंय की नाही, हे त्यांनी पाहायचं. आणि बाकी इतर गोष्टींसाठी लोकनियुक्त सरकार आहे. ते निर्णय घेत असतं. चीनचं सैन्य लडाखच्या सीमेवर घुसलंय. आता आपल्या सैन्यानं काय केलं पाहिजे, यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलायचं नसतं. देशाचे संरक्षण मंत्री, लष्करप्रमुख, पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी बोलायचं असतं. तसंच महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जी स्थिती करोनामुळे उद्भवली आहे. आणि कोणत्या पद्धतीनं अनलॉक करून लोकांना सुविधा निर्माण करायच्या, हे लोकनियुक्त सरकार ठरवेल. मुख्यमंत्री ठरवतील, उपमुख्यमंत्री ठरवतील. त्यांच्यामध्ये तुम्ही हिंदुत्ववादी आहात की नाही, हा प्रश्न कुणाला पडू नये. सरकार घटनेनुसार चाललं की नाही, हे फक्त पाहायला पाहिजे,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

आणखी वाचा- …तर प्रत्येक भाषणाच्या सुरूवातीला हिंदूह्रदयसम्राट म्हणा; ठाकरेंना चंद्रकांत पाटील यांचं आव्हान

“उद्धव ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, तर शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. मुख्य म्हणजे ज्यांनी या देशामध्ये हिंदुत्वाचा वणवा पेटवला आणि संपूर्ण देश हिंदुत्वमय केला, अशा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ते सुपूत्र आहेत. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांना किंवा आम्हाला कुणालाही हिंदुत्वाचे धडे देण्याची तशी गरज नाही. आमचं हिंदुत्व पक्कं आहे. भक्कम पायावर उभं आहे. आमचा आत्मा हिंदुत्वाचा, मन हिंदुत्वाचं आहे. आम्ही आंतरबाह्य हिंदुत्ववादी आहोत. आजच पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट सांगितलं की, महाराष्ट्राला करोनाचा धोका कायम आहे. त्याचा अर्थ असा आहे की, धोका कायम असल्यामुळे लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. ती जबाबदारी पाळतात, त्याबद्दल राज्यपालांनी त्यांना शाबासकी द्यायला हवी, पण कुणीतरी त्यांना पत्र लिहितं. हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. राज्यपाल इंग्रजीमध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात. त्याला मुख्यमंत्र्यांनी ठाकरी भाषेत उत्तर दिलेलं आहे. हे उत्तर ऐतिहासिक दस्ताऐवज आहे. मुख्यमंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या राजभवनाला कोणतंही आकांडताडंव न करता अत्यंत सुस्पष्ट, विनम्रपणे कसं उत्तर द्यावं, याचा आदर्श परिपाठ मुख्यमंत्र्यांनी शालिनतेनं, सर्व मर्यादा पाळून उत्तर दिलं आहे. त्यावर फार चर्चा होऊ नये,” असं संजय राऊत म्हणाले.