बेळगाव महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपानं स्पष्ट बहुमत सिद्ध केलेलं असताना महाराष्ट्र एकीकरण समितीला मात्र मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या विजयाचे आणि समितीच्या पराभवाचे वेगवेगळे अन्वयार्थ लावले जात आहेत. हा निकाल लागल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी भाजपावर तीव्र शब्दांमध्ये टीका केली होती. आज पुन्हा एकदा राऊतांनी बेळगावमधील परिस्थिती आणि त्याअनुषंगाने भाजपाकडून व्यक्त केला जाणारा विजयाचा आनंद यावर निशाणा साधला आहे. “बेळगावमध्ये ज्या पद्धतीने सीमाबांधवांचा आवाज दडपला जातोय, ते पाहिलं की अंगावर काटा उभा राहतो”, असं राऊत म्हणाले आहेत.

“अचानक निवडणूक घेण्यात आली”

दरम्यान, संजय राऊत यांनी बेळगावमध्ये निवडणूक घेण्याच्या निर्णयावर देखील आक्षेप घेतला आहे. “इतक्या वर्षांपासून तिथे प्रशासक नेमला होता. पण अचानक तिथे निवडणूक घेण्यात आली. प्रचाराला वेळ मिळू दिला नाही. हे सगळं पाहिल्यावर हा पराभव घडला हे जरी दुर्दैव असलं, तरी कर्नाटकचं सरकार सीमाबांधवांचा आवाज कोणत्या पद्धतीने दडपतंय हे पाहिलं की अंगावर काटा उभा राहतो. तरीही आमचे लोक तिथे संघर्ष करतात, लाठ्या खातात, तुरुंगात जातात. त्याचं कौतुक करायला हवं. पेढे कसे वाटताय तुम्ही?” अस राऊत यावेळी म्हणाले.

“लाज नाही वाटत तुम्हाला?” महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवानंतर राऊतांचा भाजपावर निशाणा

“शिवाजी महाराजांना जेव्हा अटक केली होती…”

“जसं शिवाजी महाराजांना आग्र्यात औरंगजेबानं अटक केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता. पण तरीही इथे काही लोकांना आनंद झाला होता, की महाराज अटकेत गेले. तशाच प्रकारचा आनंद या पेढे वाटणाऱ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसतो”, अशी खोचक टीका राऊतांनी केली.

कोथळा, खंजीर आणि संजय राऊत…, शिवसेना-भाजपा संघर्ष सुरूच; चंद्रकांत पाटील म्हणाले..

“इतका नालायकपणा कुणी केला नव्हता!”

बेळगाव पालिका निवडणुकीच्या निकालांविषयी बोलताना सोमवारी संजय राऊत यांनी भाजपावर परखड शब्दांमध्ये टीकास्त्र सोडलं होतं. “बेळगावात मराठी माणसाच्या झालेल्या पराभवाबद्दल आज महाराष्ट्रात ज्यांना उकळ्या फुटत आहेत, जे आज पेढे वाटतायत, त्यांना एवढंच सांगतो की महाराष्ट्रात आजपर्यंतच्या इतिहासात इतकी नादानी, इतका नालायकपणा आणि मराठी माणसाच्या बाबतीत इतकी गद्दारी आत्तापर्यंत कुणी केली नव्हती. महाराष्ट्रात अनेकांना याचं दु:ख आहे की तिथे मराठी माणूस हरवला गेला. पण तुम्ही पेढे कसले वाटताय?” असा सवाल संजय राऊत यांनी केला होता.