मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवारी साताऱ्यात दाखल झाली. यावेळी उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे मुख्यमंत्र्यांसोबत एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ट्रोल करणाऱ्यांवर टीका केली. शिकार करुन खाणाऱ्याची औलाद आहे, तुकड्यावर जगणारी आमची औलाद नाही, असे सणसणीत उत्तर शिवेंद्रराजे यांनी दिले आहे.

मंत्रिपदासाठी नव्हे तर साताऱ्याच्या विकासासाठी आपण भाजपात आल्याचे यावेळी शिवेंद्रराजेंनी सांगितले. शिवाय कोणत्याही चौकशीला घाबरूनही आपण भाजपात आलो नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नुकताच शिवंद्रराजेंनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाप्रवेशानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनी टीका केली होती, त्यांना शिवेंद्रराजेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून सातारा जिल्हा भाजपाचे झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगून शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की माझ्या कोणत्याही संस्थेची सध्या चौकशी सुरू नाही. सातारा जावळीच्या विकासासाठी मी अत्यंत ताठमानेने भाजपामध्ये गेलो आहे .कोणत्याही मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी मी गेलेलो नाही .आम्ही शिकार करून खाणाऱ्यांच्यातली औलाद आहे. कोनाच्याही तुकड्यावर जगणाऱ्यातले आम्ही नाही असे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे सातारा येथे आज दुपारी आगमन झाल्यानंतर आयोजित सभेच्या ठिकाणी उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपाच्या व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करतांना सर्वप्रथम शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना तलवार भेट दिली तर उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना पारंपारिक राजेशाही पगडी घालून त्यांचे स्वागत केले. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी उदयनराजेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात आमच्या मागण्यांकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी काँग्रेस -राष्ट्रवादीला पक्षाची आज झालेल्या अवस्थेबद्दल आत्मचिंतन करण्याचा सल्लाही दिला.