नाशिक जिल्ह्यात पुन्हा करोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुसरी लाट येण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर उद्यापासून राज्यात शाळा सुरु होणार असल्या तरी खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंदच राहतील, असा निर्णय करोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

भुजबळ म्हणाले, आज करोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. जगभरात करोनाने पुन्हा थैमान घातले आहे. देशात, राज्यात दुसऱ्या लाटेची सुरूवात होण्याची चाहूल लागली असून नाशिक जिल्ह्यातही १९ नोव्हेंबरपासून रूग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यात उद्यापासून शाळा सुरु करण्याचा निर्णय ४ जानेवारी २०२१ पर्यंत संस्थगित करण्यात आला असून डिसेंबरच्या अंतिम टप्प्यात फेर आढावा घेतल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेवून निर्णय घेण्यात येणार आहे.

शहरी भागातील पालकांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत फारशी अनुकुलता दिसून येत नाही. तर ग्रामीण भागात ५० टक्के लोकांमध्ये ती अनुकुलता दिसून येते. या पार्श्वभूमीवर दिवसांसाठी शाळा सुरू करण्याची जोखीम का घ्यायची याबाबत चर्चा करताना आपण आस्ते कदम पुढे जाण्याचा विचार करत आहोत. जगभरात करोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. नाशिक जिल्ह्यातही १९ तारखेपासून रुग्णवाढ सुरू झालेली आहे.

हळूहळू कमी होत असलेली संख्या पुन्हा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण नक्कीच आहे. डिसेंबरच्या शेवटी नाताळच्या सुट्टी संपल्यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे ४ जानेवारीपर्यंत शाळा बंदचा निर्णय कायम राहील, असे भुजबळ यावेळी म्हणाले.