नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न घेऊन शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सध्या राज्यभर ‘जनआशीर्वाद’ यात्रेवर आहेत. विविध शहरांमध्ये ते सभा घेत आहेत, त्यांच्या सभेला प्रतिसादही चांगला मिळताना दिसतोय. पण त्याचसोबत त्यांच्या सभेत पाकिटमार चोर देखील टायमिंग साधण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतंय. कारण सभेतील गर्दी ही चोरट्यांसाठी मोठी पर्वणी असते. नाशिकमध्येही असाच प्रकार समोर आला आहे.

एका वृत्तवाहिनीनुसार, शनिवारी नाशिकच्या खुटवड नगर येथे आदित्य ठाकरे यांची सभा होती. त्या सभेला गर्दीही चांगली होती. त्याचा फायदा घेत पाकिटमार चोरट्याने काही नेत्यांच्या खिश्यांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. एका चोरट्याने स्थानिक नगरसेवक दिलीप दातीर यांच्या खिश्यावरच डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा प्रयत्न फसला आणि दातीर यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर दातीर आणि शिवसैनिकांनी चोरट्याला चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर अनेकांकडून आपल्या खिशातून पैसे गायब झाल्याच्याही तक्रारी आल्या. पोलीस आता त्या चोराची चौकशी करत असून चोरट्यांची टोळीच सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

दरम्यान, विधानसभा निवडणुकांसाठी नाही तर मी जनआशीर्वाद यात्रा ही लोकांचे आभार मानण्यासाठी काढली आहे. ज्यांनी मतदान केलं त्यांचे तर मी आभार मानतोच आहे मात्र ज्यांनी आमच्या विरोधात मतदान केलं आहे त्यांची मनं जिंकण्याचं मुख्य आव्हान आहे असं यापूर्वी आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.