अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं कंगना म्हणाली होती. कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. तसंच तिला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं परत येऊ नये असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता कंगनानं संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यानंतर सर्वच स्तरातून तिच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत तिला इशारा दिला आहे.

आणखी वाचा- माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं सहन करणार नाही, कंगनाला मनसेची तंबी

“कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार आहे,” असं म्हणत प्रताप सरनाईक यांनी कंगनावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.

आणखी वाचा- धनंजय मुंडे म्हणतात, “कंगना कृतघ्न वागण्यामागे दोन कारणं असू शकतात, एक तर…”

काय म्हणाली होती कंगना?

“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असं म्हटलं. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असं कंगना म्हणाली.

आणखी वाचा- भाजपा आयटी सेल कंगनाच्या टीमचा भाग, काँग्रेसचा गंभीर आरोप

गुंडांपेक्षा पोलिसांची भीती

“मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, असं उत्तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने भाजपा नेते राम कदम यांच्या मागणीवर दिलं होतं. इतकंच नाही तर “हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज,” असं कंगना म्हणाली होती.