नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन (CAB ) काँग्रेसने दबाव आणला आहे का? कारण लोकसभेत शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा दिला. आता राज्यसभेत पाठिंबा देण्याआधी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काहीशी संदिग्ध भूमिका मांडली आहे. राज्यातलं सरकार टिकवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेवर दबाव आणल्याने ही भूमिका एका दिवसात बदलण्यात आली का? असा प्रश्न भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी हे विधेयक सादर केलं. त्यावेळी शिवसेनेने पाठिंबा दिला. मात्र या विधेयकातली सत्यता आणि स्पष्टता समोर आणली पाहिजे तोपर्यंत पाठिंबा द्यायचा की नाही हे ठरवू. येणारे लोक कोणत्या राज्यात राहणार? ते कोण आहेत? हे आधी स्पष्ट झालं पाहिजे अशी भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली. त्यावरुनच फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तसंच शिवसेना याबाबतची जुनी भूमिका बदलणार नाही अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली. दरम्यान अधिवेशनावरही त्यांनी निशाणा साधला आहे.

“नागपूरचं अधिवेशन म्हणजे या सरकारची फक्त औपचारिकता आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नवं सरकार स्थापन होऊन १३ दिवस झाले आहेत तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अशा सगळ्या परिस्थितीत अधिवेशनादरम्यान आम्ही प्रश्न विचारले तर आम्हाला मंत्री म्हणून उत्तर कोण देणार?” असाही प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे. “आम्ही नागपूरचं हिवाळी अधिवेशन दोन आठवडे घेतलं गेलं पाहिजे अशी मागणी केली होती. मात्र ही मागणी सरकारने मान्य केली नाही.” जे अधिवेशन घेतलं जातं आहे ती केवळ औपचारिकता आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मदतीवरुनही त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “राज्य सरकार सत्तेवर येताच शेतकऱ्यांना मदत करणार होतं. मात्र आता त्या मदतीचं काय झालं? अजूनही शेतकरी वाऱ्यावर आहेत. त्यांना दिलासा कोण देणार? अजून या सरकारच्या मंत्रिमंडळाचाच पेच सुटलेला नाही अशात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतं आहे. शेतकऱ्यांना मदत द्यायची असेल तर विरोधी पक्ष सरकारसोबत आहे” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.