दोन समाज समोरासमोर, राजकारण्यांचा पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न

देशात एकमेव सोलापूर जिल्ह्य़ासाठी अस्तित्वात असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नावर जातीय तेढ वाढत असून त्यामुळे सोलापुरातील सामाजिक वातावरण गढूळ होत आहे. विशेषत: ग्रामदैवत सिद्धेश्वर वा अहिल्यादेवी होळकर यापैकी कोणाचे नाव द्यायचे, यावरून वीरशैव लिंगायत समाज व धनगर समाज एकमेकांच्या विरोधात उभा ठाकला असून त्यास अर्थात राजकीय पुढारी आपापल्या पद्धतीने मताचे राजकारण करीत स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा नामांतराचा प्रश्न सामोपचाराने मिटविण्याच्या दृष्टीने सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांची कोंडी होत असल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे सहकारमंत्री सुभाष देशमुख हे मौन बाळगून आहेत, तर ज्यांनी हे सोलापूर विद्यापीठ उभारले, ते काँंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याही नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

सोलापूर विद्यापीठाची स्थापना १ ऑगस्ट २००४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पुढाकाराने झाली होती. प्रत्येक जिल्ह्य़ासाठी विद्यापीठ असावे, या विचारातून एकमेव सोलापूर जिल्ह्य़ाकरिता सोलापूर विद्यापीठाची उभारणी करतानाच या विद्यापीठाच्या बौधचिन्हावर ग्रामदैवत सिद्धेश्वराची प्रतिमा समाविष्ट केली गेली. पुढे या विद्यापीठाला सिद्धेश्वराचे किंवा महात्मा बसवेश्व्रराचे नाव देण्याचाही आग्रह झाला. त्यासाठी राज्य विधिमंडम्ळातही चर्चा उपस्थित झाली. मंत्रिस्तवर दोन-तीनवेळा बैठकाही झाल्या. त्यासाठी शिवा महाराष्ट्र वीरशैव युवक संघटनेने पाठपुरावा केला होता. नंतर गेली १२-१३ वर्षे त्यात खंड पडला. शिवा संघटनेसह इतर संबंधित मंडळींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यापीठाचा नामांतराचे घोंगडे भिजून वाळूनही गेले.

अलीकडे कोणाच्या ध्यानीमनी नसताना पुन्हा सोलापूर विद्यापीठात नामांतराचे राजकारण शिरले. एकीकडे ग्रामदैवत सिद्धेश्वर व महात्मा बसवेश्वराचे नाव देण्याची मागणी धूळ खात पडली असताना गेल्या चार वर्षांत अन्य सामानिक संघटना अचानककपणे एकापाठोपाठ आक्रमक झाल्या. नामांतरासाठी आग्रही असलेल्या काही संघटना रस्त्यावर उतरल्या. याता धनगर समाजाने आक्रमक भूमिका घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावासाठी आंदोलन उभारले. वीरशैव लिंगायत समाजाने ग्रामदैवत सिद्धेश्वर वा महात्मा बसवेश्वरांच्या नावासाठी उचल खाल्ली.  येत्या १८ सप्टेबर रोजी ग्रामदैवत सिद्धेश्वराचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी मोर्चा काढण्याचे व त्यातून मोठे शक्तिप्रदर्शन घडविण्याचे ठरविण्यात आले आहे. दरवर्षी ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेत परंपरेप्रमाणे अक्षता सोहळा होतो. त्यासाठी वीरशैवांसह इतर अठरापगड जाती-जमातींचे लाखो भाविक मंदिराच्या परिसरात दाखल होतात. यात्रेत अक्षता टाकण्यासाठी एकत्र आल्याप्रमाणेच विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वराचे नाव देण्याच्या माागणीसाठीही लाखोंच्या संख्येने मोच्र्यात यावे, असे भावनिक आवाहन करण्यात आल्यामुळे सोलापुरातील एकूणच सामाजिक वातावरण ढवळून निघत आहे.

मराठी, कन्नड, तेलुगु, उर्दू, दखनी उर्दू, हिंदी व इंग्रजी अशा अनेक भाषा गुण्यागोविंद्याने एकत्र नांदत असलेल्या सोलापुरात आता विद्यापीठ नामांतरावरून धनगर व लिंगायत हे दोन समाज एकमेकांच्या विरोधात येत असल्यामुळे येथील सामाजिक वातावरण गढूळ बनत चालले आहे. एकीकडे आपापला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांचे आजी-माजी  लोकप्रतिनिधी विसंगत भूमिका घेत असताना दुसरीगडे शासन पातळीवर हा प्रश्न अद्यापि तरी बेदखल आहे. सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांची भूमिका अस्पष्टच आहे. पालकमंत्री देशमुख हे वीरशैव लिंगायत समाजाचे असून त्यांचे सार्वजनिक क्षेत्रातील पदार्पण १८-२० वर्षांपूर्वी अर्थात शिवा वीरशैव युवक संघटनेच्या माध्यमातूनच झाले होते. २००४ साली सर्वप्रथम भाजपचे आमदार होण्यापूर्वी देशमुख हे शिवा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र शाखेचे अध्यक्षपद सांभाळत होते. शिवा संघटनेच्या माध्यमातून सोलापुरात २००१-२ साली झालेल्या अहिर्मुखी ब्रह्मेश्वर लिंगाच्या प्रश्नावरील आंदोलनाची धुरा त्यांच्याकडे होती. मात्र पुढे आमदार झाल्यानंतर त्यांनी शिवा संघटनेशी फारकत घेतली आणि अलीकडे तीन वर्षे मंत्रिपद सांभाळत असताना साहजिकच साधी ओळखही देत नसल्यामुळे त्यांच्याविषयी शिवा संघटनेचा राग कायम आहे. विद्यापीठ नामांतराच्या प्रश्नावर शिवा संघटनेला पालकमंत्री देशमुख यांचा हिशेब चुकता करायचा आहे, असे दिसते.

भाजपच्या स्थानिक राजकारणात पालकमंत्री विजय देशमुख  व सहकारमंत्री सुभाष देशमुख हे दोघेही एक मेकांना क्रमांक एकचे शत्रू समजतात. विद्यापीठ नामांतराचा तिढा पालकमंत्री देशमुख हे कसा सोडवितात, यात त्यांची कोंडी कशी होईल, याकडे सहकारमंत्री देशमुख हे लक्ष ठेवून आहेत. या प्रश्नाची जबाबदारी पालकमंत्र्यांच्या अंगावर ढकलण्याचा व त्यांना तोफेच्या तोंडी देण्याचा प्रयत्न सहकारमंत्री सुभाष देशमुख हे करीत असल्याचे बोलले जाते. सध्या तरी पालकमंत्री देशमुख यांच्याप्रमाणेच सहकारमंत्री सुभाष देशमुख हेदेखील मौन साधून आहेत. या दोन्ही देशमुखांतील संघर्ष आणि त्यंच्या नेतृत्वाच्या मर्यादा सोलापुरात सर्वाना ज्ञात आहेत.

भाजपच्या नेतृत्वाचा कस

भाजपच्या स्थानिक राजकारणात पालकमंत्री विजय देशमुख  व सहकारमंत्री सुभाष देशमुख हे दोघेही एक मेकांना क्रमांक एकचे शत्रू समजतात. विद्यापीठ नामांतराचा तिढा पालकमंत्री देशमुख हे कसा सोडवितात, यात त्यांची कोंडी कशी होईल, याकडे सहकारमंत्री देशमुख हे लक्ष ठेवून आहेत. या प्रश्नाची जबाबदारी पालकमंत्र्यांच्या अंगावर ढकलण्याचा व त्यांना तोफेच्या तोंडी देण्याचा प्रयत्न सहकारमंत्री सुभाष देशमुख हे करीत असल्याचे बोलले जाते. सध्या तरी पालकमंत्री देशमुख यांच्याप्रमाणेच सहकारमंत्री सुभाष देशमुख हेदेखील मौन बाळगूून आहेत.