प्रदीप नणंदकर

सोयाबीनचा भाव या वर्षी वेगाने वाढत असून शुक्रवारी प्रति क्विंटल आठ हजारांपेक्षा अधिकचा भाव सोयाबीनला मिळाला. सोयाबीनचा हमीभाव तीन हजार ८८० रुपये असून या वर्षी एप्रिल महिन्यात हमीभावाच्या दुप्पट भाव सोयाबीनला मिळतो आहे. ज्या शेतकऱ्यांनी सध्या बाजारपेठेत सोयाबीन विकण्यासाठी आणले त्यांचा मोठा फायदा होत आहे. बाजारपेठेत अजूनही सोयाबीनची रोज पाच हजार क्विंटल इतकी आवक आहे.

या वर्षी काढणीच्या वेळी झालेल्या पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पुरामध्ये काढणी झाल्यानंतर बांधून ठेवलेले सोयाबीन वाहून गेले. तर भिजल्यामुळे उत्पादनात घट झाली होती. ही नेमकी घट किती, याचा अंदाज कोणालाही येत नव्हता. शासनाने जे गृहीत धरले होते त्यापेक्षा कमी उत्पादन झाले. त्याच वेळी अन्य सोयाबीन उत्पादक देशातही उत्पादनात घट झाली. त्यामुळे आता सोयाबीनला चांगले भाव मिळत आहेत.

भारतातील सोयाबीनच्या पेंडीला जगभर उच्च दर्जाची मागणी आहे. सोयाबीनचे भाव वाढले असतानाही सोयाबीन पेंडीच्या निर्यातीवर परिणाम होत नाही. पुरवठा कमी व मागणी अधिक या तत्त्वाने दररोज भाव वाढत आहेत. अलीकडच्या काळातील हा उच्चांकी भाव असून आठ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिकचा भाव बाजारपेठेत मिळतो आहे. सोयाबीनचे भाव याहीपेक्षा काही प्रमाणात वाढतील, असा अंदाज लातूर बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांनी व्यक्त केला.

सूर्यफुलाचेही भाव चढेच

सोयाबीनबरोबर या वर्षी सूर्यफुलाचे भावही गगनाला भिडले आहेत. गेले अनेक वर्षे सूर्यफूल हमीभावापेक्षा कमी भावाने बाजारपेठेत विकले जात होते. त्यामुळे सूर्यफुलाचा पेरा दरवर्षी घटत होता. या वर्षी तेलंगणा प्रांतात तेथील सरकारने सूर्यफूल उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला हमीभावाने खरेदी करण्याची हमी दिली. सूर्यफुलाचा हमीभाव ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल आहे. मात्र, या वर्षी तेलबियाच्या उत्पादनात झालेल्या घटीमुळे सूर्यफुलालाही आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळतो आहे. लातूर बाजारपेठेत सूर्यफुलाची फारशी आवक नसली तरी प्रति क्विंटल आठ हजार रुपये भाव असल्याची माहिती अडत व्यापारी बाळू बिदादा यांनी दिली. सोयाबीन व सूर्यफूल या दोन्हीच्या भावात झालेल्या विक्रमी वाढीमुळे याचा परिणाम पुढील वर्षाच्या पेऱ्यावर होण्याची शक्यता आहे.