मोहन अटाळकर
पश्चिम विदर्भात रेल्वेमार्गाचे जाळे विकसित करण्यासाठी भरपूर वाव असतानाही राजकीय इच्छाशक्तीअभावी अनेक रेल्वेमार्गाचे काम कित्येक वर्षांपासून रखडले असून ठप्प पडलेल्या प्रकल्पांना आगामी काळात गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अकोला-खंडवा मार्गाच्या ब्रॉडगेज रुपांतराचे रखडलेले काम, अचलपूर-मुर्तिजापूर शकुंतला रेल्वे मार्गाची उपेक्षा, खामगाव-जालना रेल्वेमार्गाचे भिजत घोंगडे, बडनेरा-वाशीम रेल्वेमार्गाने जोडणे, वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग उभारणीची संथगती, अकोला-खंडवा ब्रॉडगेज रुपांतरातील अडथळे असे अनेक प्रश्न कायम आहेत.
विदर्भ आणि मराठवाडय़ाला जोडणाऱ्या खामगाव -जालना रेल्वे मार्गाचे भिजत घोंगडे शंभर वर्षांनंतरही कायम आहे. १५५ किमीच्या या मार्गासाठी १९१०मध्ये इंग्रज सरकारने पाऊले उचलली होती. प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी आराखडा तयार झाला. १९१२ मध्ये मंजुरीदेखील मिळाली. थांबे निश्चिती होऊन नकाशे तयार झाले. पण, दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि इंग्रजांचे या मार्गाकडे दुर्लक्ष झाले. पुढे १९६३ मध्ये नव्याने सर्वेक्षण झाले. १९९४ व २००२ मध्येही या मार्गाचे सव्र्हेक्षण झाले. पण, निधीची तरतूद झाली नाही.
शकुंतला रेल्वेमार्गाची उपेक्षा
गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षित अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ या मार्गावरील शकुंतलेची उपेक्षा दूर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ हा १९० किमी लांबीचा नॅरोगेज मार्ग १९१३ दरम्यान किलिक निक्सन या ब्रिटीश कंपनीने सुरू केला होता. भारत सरकारने एका कराराने ही रेल्वे चालविण्यास घेतली आहे. या मार्गाकडे रेल्वेचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. ही रेल्वे तोटय़ात असल्याने रेल्वेला कायमस्वरुपी बंद करायची आहे. या मार्गाच्या विस्तारीकरणासाठी ५४० कोटींची योजनाही तयार करण्यात आली होती. पण, पुढे काहीच झाले नाही. या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाल्यास पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यांना त्याचा फायदा होऊ शकेल.
बडनेरा-वाशीम हा उत्तम पर्याय
उत्तरेला दक्षिणेसोबत जोडणाऱ्या दिल्ली-इटारसी-खंडवा-बेंगळुरू तसेच दिल्ली-इटारसी-नागपूर-वारंगल-बेंगळुरू यापैकी कोणत्याही मार्गावर अपघात झाल्यास रेल्वेचे व्यवस्थापन कोसळते. अनेक गाडय़ांचा मार्ग बदलावा लागतो. पण, वाशीम-बडनेरा हा रेल्वे मार्ग तयार झाल्यास दिल्ली-बेंगळुरू हा तिसरा पर्याय तयार होऊ शकतो. देशाची ऊर्जा, इंधनासोबत प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचण्याचा नवा ‘मार्ग’ सापडू शकतो.
बडनेरा वाशीम या रेल्वे मार्ग निर्मितीची मागणी गेल्या तीन-चार दशकापासून होत आहे. सन २००८-०९ मध्ये रेल्वेच्या केंद्रीय अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गाच्या सव्र्हेक्षणाचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे रेल्वे बोर्डाने या मार्गाच्या सव्र्हेक्षणास मंजुरी दिली होती. त्यानुसार रेल्वेच्या त्या विभागाने या रेल्वे मार्गाचे सव्र्हेक्षण करुन सदर अहवाल १६ जून २०१० रोजी रेल्वे बोर्डाला सादर केला होता. मात्र, त्यानंतरच्या काळात या रेल्वे मार्गासंदर्भात अपेक्षित कामकाज झाले नाही. २०१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पात बडनेरा-वाशीम रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला नव्याने मंजुरात दिली होती.
बडनेरा वाशीम या १०८ कि.मी. रेल्वे मार्गासाठी व नव्या ९ रेल्वे स्थानकांच्या निर्मीतीसाठी ७०२.८४ हेक्टर शेतजमीनीची आवश्यकता आहे. या रेल्वे मार्गामुळे दक्षिण उत्तर राज्यामधील अंतर सुमारे १०० किलोमीटरने कमी होणार असून, वेळेतही बचत होईल.
विशेष म्हणजे केंद्र सरकारने सन २०१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पात बडनेरा-वाशीम रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला नव्याने मंजुरी दिली होती. मध्य रेल्वेने सन २०१६-१७ मध्ये या रेल्वे मार्गाच्या सव्र्हेक्षणाचे काम होती घेतले होते.
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाची संथगती
वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन रेल्वे मार्गाचा पायाभरणी समारंभ ११ फेब्रुवारी २००९ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते पार पडला होता. मात्र गेल्या दशकभरात अत्यंत कासवगतीने या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या रेल्वे मागार्साठी आवश्यक असलेले जमीन अधिग्रहणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात कळंबपर्यंत गलमगाव, खुटाळा, गंगादेवी, कामठवाडा, एकलासपूर परिसरात माती काम सुरु झाले आहे. या प्रकल्पाची सध्याची किंमत ३१६८ कोटीपर्यंत पोहोचली आहे. या रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अकोला-खंडवा मार्ग रखडला
अकोला-खंडवा मार्गावरील ब्रॉडगेज रूपांतराचे काम रखडले आहे. वऱ्हाडातील व्यापार व उद्योगांना चालना मिळण्यासाठी अकोला-खंडवा रेल्वे मार्ग ब्रॉड होणे गरजेचे आहे. अकोला ते अकोट पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अकोट ते खंडवा रुंदीकरण मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे वादात अडकलेले आहे. पर्यावरणवाद्यांनी जुन्या मार्गावर ब्रॉडगेज रुपांतरणास विरोध केला आहे. वनविभागाच्या जमिनीला वळसा घालून नवीन मार्गाचा प्रस्ताव करण्यात आला. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींचा त्याला विरोध आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातूनच हा मार्ग जावा, यासाठी काही लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. दुसरीकडे, बुलढाणा जिल्हावासीयांना पर्यायी मार्ग व्हावा, अशी अपेक्षा आहे. यात मध्यममार्ग काढून या रेल्वेमार्गाचे ठप्प पडलेले काम पुन्हा सुरू करावे, अशी लोकांची मागणी आहे.