News Flash

वाहतूक शाखेच्या ‘अकोला पॅटर्न’ची राज्यभर अंमलबजावणी

अकोल्यातील बेताल वाहतूक, त्यातच निर्माणाधीन उड्डाणपूल, रस्ते व मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यात पोलिसांची तारांबळ उडते.

बुलेटचे बनावट ‘सायलेन्सर’ चिरडताना वाहतूक पोलीस.

|| प्रबोध देशपांडे
अनेक शहरांमध्ये विशेष मोहिमेचे अनुकरण
अकोला : वाहतूक पोलीस म्हटले की, सर्वसामान्यांच्या मनात आडी. अकोल्यात मात्र या उलट शहर वाहतूक शाखेच्या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये पोलिसांची प्रतिमा उजळली आहे. कर्तव्यासोबतच संकटकाळी मदतीचा हात देत वाहतूक शाखेने सामाजिक बांधिलकी जोपासली. करोनासारख्या संकट काळात वाहतूक शाखेने विविध आदर्श उपक्रमांचा ‘अकोला पॅटर्न’ यशस्वी केला. त्याची दखल मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी देखील घेतली. राज्यातील अनेक शहरांमध्ये अकोला शहर वाहतूक शाखेच्या विशेष मोहिमेचे अनुकरण करण्यात येत आहे.

अकोल्यातील बेताल वाहतूक, त्यातच निर्माणाधीन उड्डाणपूल, रस्ते व मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यात पोलिसांची तारांबळ उडते. तारेवरच्या कसरतीप्रमाणे कर्तव्य बजावत असतानाच शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्याला सामाजिक कार्य आणि माणुसकीच्या कार्याची जोड दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या संकल्पनेतून वेगवेगळे उपक्रम व मोहीम राबविल्या आहेत. काही दिवसांमध्येच त्याला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले अन् वाहतूक शाखेचा ‘अकोला पॅटर्न’ राज्यातील विविध शहरांमध्ये पोहोचला आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेत अचानक संपूर्ण देशात टाळेबंदी लागू झाली. या काळात अनेक ज्येष्ठ नागरिकांचे आप्तस्वकीय इतर राज्यात किंवा जिल्ह्यात अडकून पडले होते. या भीषण आपत्तीमध्ये एकटे पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शहर वाहतूक शाखेने ‘एक कॉल करा, मदत मिळवा’ ही मोहीम सुरू केली. अडचणीत असलेल्या असंख्य ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक शाखेच्या मदतीचा आधार मिळाला. टाळेबंदीमध्ये सर्वच बंद असल्याने ऑटो चालकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. आजारी व ज्येष्ठ ऑटोचालकांची उपासमार होत असतांना सामाजिक संस्थांची मदत घेऊन वाहतूक शाखेने त्यांना एक महिन्याचा संपूर्ण शिधा पुरवला. सुमारे ५० ऑटो चालकांना त्याचा लाभ झाला. ऑक्टोबर २०२० पासून करोना प्रादुर्भाव वाढू लागल्यावर मुखपट्टी वापराविषयी जनजागृती होण्यासाठी ‘नो मास्क, नो सवारी’ ही मोहीम सुरू करण्यात आली. शहरातील पाच हजार ऑटोंवर जनजागृती फलक लावून ऑटो चालक व प्रवाशांना मुखपट्टीची सक्ती करण्यात आली. त्यामुळे करोना प्रसारास आळा बसण्यास मदत झाली. या मोहिमेची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: घेतली व राज्यातील सर्वच जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर अकोल्यात मुहूर्तमेढ रोवलेल्या या मोहिमेला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले. राज्यातील अनेक शहरात याला चांगला प्रतिसाद मिळाला.

करोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ विविध स्पर्धा घेण्यात आल्या. रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यावर शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील पोलीस विभागातील पहिले रक्तदान शिबीर अकोला शहर वाहतूक शाखेने घेतले. त्यात अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. अपघात कमी करण्यासाठी २५० ऑटो चालकांची नेत्र चिकित्सा करण्यात आली. तत्कालीन गृहमंत्र्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उपक्रमांची दखल घेत कौतुक केले.

फटाके फोडणाऱ्या बुलेट सर्वच शहरांमधील नागरिकांची डोकेदुखी. अकोल्यातही हा त्रास प्रचंड वाढल्याने वाहतूक शाखेने बनावट ‘सायलेन्सर’ थेट नष्टच केले. चालकांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यासह न्यायालयाचा आदेश घेऊन रोडरोलरखाली ‘सायलेन्सर’ चिरडण्यात आले.

या मोहिमेत कुठल्याही दबावाला बळी न पडता शहरातील धनदांडग्या व राजकीय वरदहस्त असलेल्या ५४ बुलेट चालकांना दणका देण्यात आला. ‘अकोला पॅटर्न’मधील ही विशेष मोहीम महाराष्ट्रासह राज्याबाहेरील विविध शहरांमध्ये सुद्धा राबविण्यात ये आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून अकोला वाहतूक शाखा पोलिसांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

‘हरवलेले परत मिळाले’

रस्त्यात सापडलेल्या विविध वस्तू मूळ मालकाचा शोध घेऊन त्याला परत करण्याचा विशेष उपक्रम देखील वाहतूक शाखेने सुरू केला. शहर वाहतूक विभागात जवळपास ८० कर्मचारी आहेत. रस्त्यावर नागरिकांचे पर्स, पैसे, मोबाइल, कागदपत्रे आदी हरवलेले साहित्य वाहतूक पोलिसांना सापडल्यास त्याची शहानिशा करून मूळ मालकाला परत करण्यात येतात. या मोहिमेत ऑटो चालक देखील हिरिरीने सहभागी झाले आहेत. आतापर्यंत १२ मोबाइल, दोन पर्स, तीन पाकीट व महत्त्वाची कागदपत्रे मूळ मालकांना परत देण्यात आले. या मोहिमेमुळे नागरिकांना दिलासा मोठा मिळाला.

वाहतूक पोलीस हा जिल्हा पोलिसांचा चेहरा, कारण रस्त्यावर अहोरात्र दिसणारा हाच पोलीस असतो. सर्वसामान्य जनतेच्या मनात अकोला पोलिसांची एक चांगली प्रतिमा निर्माण व्हावी म्हणून तत्कालीन परिस्थिती आणि आवश्यकतेनुसार विविध उपक्रम राबविण्यात आले. या मोहीम यशस्वी झाल्याचे समाधान आहे. – गजानन शेळके, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, अकोला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 12:00 am

Web Title: statewide implementation of akola pattern of transport branch akp 94
Next Stories
1 रायगड – महाड तालुक्यात दरड कोसळली
2 वाईजवळ दरड कोसळली;१५ जणांना बाहेर काढले
3 चिपळूणमध्ये पावसाचा हाहा:कार; अजूनही पाणी कमी होईना, NDRF चं बचावकार्य सुरू!
Just Now!
X