– संदीप आचार्य

करोनाच्या भितीपोटी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरसह शहरी भागातील रक्तदान शिबिरे ठप्प पडली आहेत. याच्या परिणामी राज्यातील रक्तपेढ्यांमधे रक्ताच्या पिशव्यांची संख्या वेगाने कमी होऊ लागली असून आता केवळ १० ते १२ दिवस पुरेल एवढाच रक्त साठा राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये शिल्लक असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही याला दुजोरा दिला असून लोकांनी गर्दी न करता रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये आजच्या दिवशी ६९७७ रक्ताच्या पिशव्या शिल्लक आहे. रोज साधारणपणे ८०० ते १००० रक्ताच्या पिशव्यांची गरज असते. राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये आजच्या दिवशी ३८,३०८ रक्ताच्या पिशव्या उपलब्ध असून राज्याची रोजची रक्ताची गरज ४५०० ते ५००० एवढी असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

राज्यातील विविध रुग्णालयात होणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी दरमहा सुमारे सव्वा लाख रक्ताच्या पिशव्यांची गरज असते. गेल्या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये ऐच्छिक रक्तदानाच्या माध्यामातून १७ लाख २३ हजार रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्या होत्या. याचाच अर्थ दरमहा राज्यात सव्वा लाख ते एक लाख ४० हजार रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात येत होत्या. गेल्या वर्षी हे रक्त गोळा करण्यासाठी सुमारे २८ हजार रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. राज्यात होणाऱ्या एकूण रक्तदान शिबिरांपैकी बहुतेक शिबिरे ही मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर आदी शहरी भागात होत असतात. स्वयंसेवी संस्था तसेच राजकीय पक्षांच्या माध्यमातून ही शिबिरे आयोजित करण्यात येत असून करोनामुळे ही शिबिरे जवळपास ठप्प झाल्याचे वेगवेगळ्या रक्त पेढ्यांमधील या शिबिरांचे आयोजन करणाऱ्या समाजसेवकांचे म्हणणे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार लोकसंख्येच्या एक टक्का एवढ्या रक्ताचा साठा असला पाहिजे. राज्यात गेल्या वर्षी यापेक्षा जास्त रक्त जमा झाले होते. प्रामुख्याने मार्च, एप्रिलपासून जूनपर्यंत रक्ताची जास्त गरज लागले, कारण या कालावधीत परीक्षा तसेच लोक गावी जात असल्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या रोडावते. यातच करोनाच्या भितीमुळे रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यास स्वयंसेवी संस्था पुढे येताना दिसत नाही तसेच जेथे शिबिरांचे आयोजन केले जाते तेथे लोक रक्तदानासाठी येत नाहीत. परिणामी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता निर्माण होऊ लागली आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने केवळ १० ते १२ दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा शिल्लक असल्याचे सांगितले.

राज्यात आजघडीला ३४१ रक्तपेढ्या असून यात ७६ सरकारी तर २६५ खाजगी व निमशासकीय रक्तपेढ्या आहेत. साधारणपणे राज्यात दरमहा २५०० शिबिरे होत असतात. यातील बहुतेक रक्तदान शिबिरे ही शहरी भागात होत असून आज या शिबिरांची संख्या रोडावली आहे.

लोकांनी रक्तपेढ्यांमध्ये जाऊन रक्तदान करावे तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजनही करावे. मात्र या रक्तदान शिबिरात एकाच वेळी रक्तदान करण्यासाठी गर्दी होणार नाही याची काळजी घेत ५० ते १०० रक्ताच्या पिशव्या जमा करावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.