पोलिसांनी सामान्य आदिवासींचा छळ करणे थांबवले नाही तर राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्यात येईल, असा इशारा नक्षलवाद्यांनी पत्रकातून दिला आहे. छत्तीसगडमधील हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर हे पत्रक जारी झाल्याने राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे.
शेजारच्या गडचिरोली जिल्हय़ातील एटापल्ली तालुक्यातील लेंडेर गावात नक्षलवाद्यांनी ही पत्रके टाकली आहेत. गेल्या १२ जूनच्या रात्री नक्षलवाद्यांनी याच गावाजवळ लॉयड स्टीलच्या दोन अधिकाऱ्यांसह तिघांची हत्या केली होती. या हत्याकांडाचा साक्षीदार असलेल्या शिवाजी ऊर्फ ऐतू पदा नावाच्या सहकाऱ्याला पोलिसांनी अटक केल्याने नक्षलवादी संतप्त आहेत. प्रारंभीचे तीन दिवस शिवाजीला पोलिसांनी अटक दाखवली नव्हती. तोच धागा पकडत नक्षलवाद्यांनी जारी केलेल्या पत्रकात पोलिसांवर आरोप केले आहेत. चळवळीशी संबंध आहे असे दाखवून दुर्गम भागात राहणाऱ्या सामान्य आदिवासींना ताब्यात घ्यायचे, नंतर अटक दाखवायची किंवा खोटय़ा चकमकीत ठार मारण्याचे उद्योग पोलीस व सुरक्षा दलांनी पूर्व विदर्भात सुरू केले असून, सामान्य नागरिकांचा केला जाणारा छळ सहन केला करणार नाही, असा इशारा नक्षलवाद्यांनी दिला आहे.
नक्षलवाद्यांनी प्रथमच आदिवासींच्या छळाला राजकीय नेत्यांना जबाबदार धरले आहे. या छळाची जबाबदारी या भागात काम करणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांना स्वीकारावी लागेल असे नमूद करणाऱ्या नक्षलवाद्यांनी संबंधित राजकीय नेत्यांची गय केली जाणार नाही, अशी धमकी या पत्रकातून दिली आहे.
नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला करून मोठय़ा राजकीय नेत्यांना ठार केले. हाच प्रकार इतर भागांतसुद्धा घडवून आणण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांकडून होण्याची शक्यता असल्याचे या पत्रकावरून आता स्पष्ट झाले आहे. पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एटापल्लीत गेल्या आठवडय़ात झालेल्या तिहेरी हत्याकांडाचा प्रत्यक्षदर्शी नक्षलवादी सध्या अटकेत असल्याने या भागाची धुरा सांभाळणारे नक्षलवादी नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच आता त्यांच्या पत्रकात राजकीय नेत्यांना धमकी देण्याचा मुद्दा टाकण्यात आला आहे. छत्तीसगडच्या घटनेनंतर या भागातील राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा नियमितपणे घेतला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.