आटपाडी तहसीलदारांसह इतर पाच महसूल कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई आणि विटा येथील महसूल कर्मचाऱ्यांवर वाळू माफियांकडून झालेला हल्ला याच्या निषेधार्थ गेले दोन दिवस काम बंद आंदोलन सुरू आहे. या संदर्भात संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन सुरक्षेची मागणी केली आहे.
बेकायदा गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी महसूल विभागाकडून कारवाई केली जाते. मात्र या कारवाईवेळी गुंडगिरी करीत हल्ले केले जातात. कर्मचाऱ्यांवरच खोटे गुन्हे दाखल केले जातात. वाळू ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर महसूल कर्मचाऱ्यांच्या विरोधात आटपाडी न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यामुळे कर्मचारी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली असून संरक्षण मिळावे यासाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. संघटनेचे पदाधिकारी बाळासाहेब सौदे, बी.आर.पाटील, राजेंद्र शेळके हे आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत.