सुभाष देशमुख यांचे सदाशिवराव पाटील यांना निमंत्रण

सांगली : ‘‘रेल्वे’चे की ‘एसटी’चे, कुठले तिकीट हवे?’ असे विचारत पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनाच निरुत्तर करीत भाजप प्रवेशाचे खुले आमंत्रण दिले. विटा शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन देशमुख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

देशमुख म्हणाले, की शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी, शेतकऱ्यांना मुबलक पाणी, वीज, खते, बियाणे मिळावे, यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली ७१ वष्रे काँग्रेसने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांना केंद्रिबदू मानून काम करत आहे. ठराविक गटाला कर्ज देण्याची काँग्रेसची दृष्टनीती आहे. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार आग्रही असल्याचा विश्वास लोकांना असल्याचे सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. विटय़ाचे वैभव वाढविण्यासाठी विटा पालिका काँग्रेसमुक्त करूया. माजी आमदार पाटील यांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी अगोदर सदाशिवराव पाटील यांना भाजपने तिकीट जाहीर करावे मगच भाजप प्रवेशाचा विचार करू असे सांगताच मंत्री देशमुख यांनी ‘कुठले तिकीट हवे ‘रेल्वे’चे (लोकसभा) की ‘एसटी’चे (विधानसभा)?’ असे विचारत थेट पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिले. तसेच याच वेळी उपस्थितांना मोबाइलवर टोलफ्री क्रमांक टाइप करून कॉल करण्याचा सल्ला दिला. उपस्थितांपकी काहींनी गंमत म्हणून तो क्रमांक लावताच आपले भारतीय जनता पक्षात स्वागत असल्याचे संदेश आले.

या वेळी  खा. संजयकाका पाटील यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्यावर नाव न घेता टीका करताना सांगितले, की तुमच्यामुळे टेंभूला गती मिळतेय, तुमचे प्रयत्न आहेत. आम्ही जाहीर मान्य करतो. पण माझ्यामुळेच काम होते असा आभास निर्माण करू नका. येत्या सव्वा वर्षांमध्ये टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचेल.

माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले, की पाणी योजना सुरू झाल्यानंतर एक दिवसाआड मुबलक पाणी मिळेल. विकासकामांना सर्वाधिक निधी खासदारांनी दिला. अमरसिंह देशमुख, अशोक गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत किरण तारळेकर यांनी केले. या वेळी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्षा प्रतिभा चोथे, सुहास शिंदे, सुशांत देवकर, अनिल म. बाबर, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार रंजना उबरहंडे, मुख्याधिकारी महेश रोकडे, जिल्हा माहिती अधिकारी संपदा बीडकर यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.