उस्मानाबाद तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना परिसरात शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी पावणेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे कारखान्याच्या दोन गोदामांवरील पत्रे उडाल्याने पावसात साखर भिजून मोठे नुकसान झाले. कारखाना परिसरातील सौरऊर्जा प्रकल्पाकडील हमालचाळींवरील पत्रेही उडाले. परिसरातील डिझेलपंप, पथदिव्यांचे खांब व झाडेही वादळी वाऱ्याने उन्मळून पडली.
मान्सूनपूर्व दमदार पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असला, तरी पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना कायम आहे. बामणी, केशेगाव, उमरेगव्हाण, करजखेडा या परिसरातही मोठय़ा प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. आंबेडकर कारखाना कार्यस्थळी दोन तात्पुरती गोदामे आहेत. एका गोदामात ४८ हजार, तर दुसऱ्या गोदामात दीड लाख साखरेची पोती ठेवण्यात आली होती. दुपारी वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला. यात गोदामावरील काही पत्रे उडून पावसाचे पाणी थेट साखरेच्या पोत्यांवर पडले. त्यामुळे बहुतांश साखरेची पोती भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या बरोबरच सौरऊर्जा प्रकल्पाशेजारी असलेले पथदिव्यांचे खांब, डिझेलपंप व मोठी झाडेही पडल्याने कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
काही महिन्यांपूर्वी बगॅसच्या गोण्यांना आग लागून कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. मागील महिन्यातच कारखान्याचा गाळप हंगाम संपल्यानंतर कारखाना स्थळावरील रसाच्या टाकीची साफसफाई करताना विषारी वायू तयार होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटना ताज्या असतानाच शनिवारी वादळी वाऱ्यात गोदामातील साखर भिजून कारखान्याचे पुन्हा लाखोंचे नुकसान झाले.