खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

महाराष्ट्रात किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर सरकारला जाग येणार आहे. राज्यात दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना मुख्यमंत्र्यांना शांतपणे झोप कशी येते, असा सवाल करीत खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मार्केटिंग’साठी दहा पकी दहा मार्क दिले पाहिजेत, अशी टीका केंद्र सरकारच्या तीन वर्षांच्या कारभारावर पत्रकार बठकीत केली.

यशस्विनी सामाजिक अभियान व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘उमेद’ कार्यक्रमानिमित्त खासदार सुळे बुधवारी परभणीत आल्या होत्या. शेतकरी विधवा महिलांना स्वतच्या पायावर उभे करणे व त्यांच्या मुलांचे शिक्षण, आत्महत्यागस्त शेतकरी कुटुंबाचे संपूर्ण पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनातून मराठवाडय़ात उमेद हा कार्यक्रम राबविला जात आहे. १६ ते ४० वयोगटातील २१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवांना उदरनिर्वाहासाठी साहित्य वाटप करण्यात आले, अशी माहिती खासदार सुळे यांनी पत्रकार बठकीत दिली. या विधवा महिलांना आयुष्यभर औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात मोफत उपचार दिले जाणार आहेत. तसेच त्यांच्या मुलांना १८ वर्षांपर्यंत ही सुविधा मिळणार आहे. त्यासाठी आरोग्य कार्डाचे वाटप करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

कापूस, सोयाबीन, तूर, केळी आदी पिकांना हमीभाव मिळत नाही. हळदीचे भाव निम्म्यावर आले आहेत. ही शेतकऱ्यांची फसवणूक असून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे धोरण सरकारचे आहे, असे खासदार सुळे यांनी सागितले. मध्यावधी निवडणुकीबाबत त्यांनी स्पष्ट उत्तर देण्याऐवजी त्या म्हणाल्या की, निवडणुका येतील जातील परंतु शेतकऱ्यांची आज कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी आहे. या सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे करणे अवघड असते. राज्यात सर्वत्र सरकारचा खोटेपणा चालला आहे. विरोधात असताना मुख्यमंत्री आघाडी सरकारवर शेतकरी आत्महत्याप्रकरणी खुनाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी करत होते. आता या मागणीचा त्यांना विसर पडला आहे, असा  राज्य सरकारचा खरपूस समाचार खासदार सुळे यांनी घेतला. शिवसेनेची सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी आहे. या प्रश्नावर खासदार सुळे यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेना दोन्ही दगडावर पाय ठेवून आहे. सरकारबाहेर पडून कर्जमाफीची मागणी करण्याची हिंमत सेनेने दाखवावी, असे सांगितले. शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांच्या तूर घोटाळ्याबाबत पारदर्शकतेचे ढोल वाजवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनीच उत्तर द्यावे, असे पत्रकाराच्या एका प्रश्नाच्या उत्तरात खासदार सुळे यांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीला पंधरा वर्षांनंतर सत्ता गमवावी लागली. मतदारांत एवढी नाराजी असेल तर सत्तेत राहण्यात मजा नाही, असे त्या म्हणाल्या. परभणी महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या पराभवावर त्यांनी ‘कभी हार कभी जित होती है’ अशी प्रतिक्रिया दिली.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. फौजिया खान, प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, जिल्ह्यचे प्रभारी प्रकाश सोळंके, जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, विजय भांबळे, रामराव वडकुते, उषा दराडे, जि. प. अध्यक्षा उज्ज्वला राठोड, उपाध्यक्षा भावना नखाते, माजी खासदार सुरेश जाधव उपस्थित होते.

ऑगस्टपासून हुंडाविरोधी जागर

विधवा महिलांना सासरच्यांकडून संपतीचा वाटा दिला जात नाही, असे प्रसंग अनेक ठिकाणी घडत आहेत. त्या महिलांना आपला हक्क मिळाला पाहिजे. यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. हुंडा देणे व घेणे हा गुन्हा आहे. परंतु आज हुंडय़ामुळे अनेक महिलांचे संसार उघडय़ावर येत आहेत. त्यांना हुंडय़ापायी सासरच्यांकडून त्रास सहन करावा लागतो. हुंडा प्रथा बंद झाली पाहिजे, यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने ऑगस्ट २०१७पासून हुंडाविरोधी जागर हे अभियान राबविण्यात येणार आहे. महिला-पुरुष व समाजात चर्चा घडवून आणून परिवर्तन व्हावे, हा अभियानाचा उद्देश असल्याची माहिती खासदार सुळे यांनी दिली.