भैय्याजी जोशी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरचिटणीसपदी (सरकार्यवाहक) शनिवारी निवड करण्यात आली. पुढील तीन वर्षांसाठी ते या पदावर कार्यरत असणार आहेत. सलग चौथ्यांदा जोशी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.


भय्याजी जोशी यांनी संघाच्या सरचिटणीसपदाचा कारभार पुन्हा स्विकारावा अशी संघाच्या अनेक नेत्यांची इच्छा होती. मात्र, जोशी यांचा स्वतःचा याला विरोध होता. त्यामुळे या निवडीपूर्वी या पदासाठी दत्तात्रय होसबाळे आणि कृष्ण गोपाळ यांच्या नावाची चर्चा होती. संघाच्या सरचिटणीस पदाची ही निवडणूक यासाठी महत्वाची मानली जात होती कारण पुढील वर्षी लोकसभेसहीत अनेक राज्यातील विधानसभा निवडणूका होणार आहेत.

नागपूरच्या हेडगेवार स्मारक समितीच्या सभागृहात संघाची ही तीन दिवसीय बैठक सुरु आहे. ९ ते ११ मार्च दरम्यान ही बैठक पार पडणार आहे. दरम्यान, आजच्या दुसऱ्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत भय्याजी जोशी यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, संघाच्या या बैठकीत भारतीय बोली भाषांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. भाषा ही कोणत्याही व्यक्ती किंवा समाजाची ओळख म्हणून महत्वपूर्ण काम करते. तसेच ती संस्कृतीचा अविभाज्य घटक असते, असे मत या बैठकीत मांडण्यात आले.