दिल्लीमधील निझामुद्दीन मरकजमध्ये पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे भारतावरील करोनाचं संकट अधिक गंभीर झालं आहे. एकीकडे या कार्यक्रमामुळे शेकडो लोकांना करोनाची लागण झाल्याची भीती असताना एक धक्क्कादायक माहिती समोर आली आहे. निझामुद्दीनप्रमाणेच तबलिगी जमातने वसईतही तितकाच मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली होती. पण महाराष्ट्र सरकारने शेवटच्या क्षणी परवानगी नाकारली आणि मोठं संकट टळलं. अन्यथा निझामुद्दीनप्रमाणे वसईदेखील करोनाचं हॉटस्पॉट ठरण्याची भीती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर हा नियोजित कार्यक्रम झाला असता तर या कार्यक्रमाला दिल्लीप्रमाणे देशभरातील तसंच परदेशी नागरिकांनी हजेरी लावली असती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी जानेवारीत परवानगी मागण्यात आली होती. पालघर पोलिसांनी त्यासाठी परवानगी दिली होती. कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी यांनी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक गौरव सिंग यांच्यासोबत बैठक घेतली आणि या कार्यक्रमासंबंधी सविस्तर चर्चा केली.

यावेळी किती लोक कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत यासंबंधीही चर्चा करण्यात आली. हजारो लोक कार्यक्रमासाठी हजर राहणार असून यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यानंतर करोना व्हायरसचा धोका लक्षात घेता देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आली आणि कार्यक्रम रद्द आला.

मिळालेल्या माहितीनुसार, वसईमधील या कार्यक्रमाला ५० हजार लोक उपस्थित राहणार होते. वसईमध्ये १२-१३ मार्च रोजी सनसिटी येथे हा कार्यक्रम होणार होता. २२ जानेवारी रोजी आयोजकांनी कार्यक्रमासाठी परवानगी मागितली होती, ज्यासाठी ६ फेब्रुवारीला परवानगी देण्यात आली होती. पण राज्यात करोना व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आणि परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला आयोजकांनी आम्ही कार्यक्रम ठरल्याप्रमाणे करु असं सांगितलं. यावर आम्ही त्यांना कायदेशीर कारवाई केली जाईल असं स्पष्ट सांगितलं.

तबलिगी जमातच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, “महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कार्यक्रम घेण्याची योजना होती. यामध्ये रायगड, रत्नागिरी, पुणे यांचा समावेश होती. आम्ही यासंबंधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित असतील असं सांगितलं होतं. पण त्यांनी आम्हाला कार्यक्रम पुढे ढकलण्यास सांगितलं. परिस्थिती लक्षात घेता आम्हीही कार्यक्रम रद्द केला. आम्ही सर्वांना तिथे येऊ नये असा संदेश पाठवला”.

तबलिगी जमातचा हा कार्यक्रम मात्र दिल्लीत पार पडला. या कार्यक्रमाला २५०० लोक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी हजर राहिलेल्या अनेकांचा करोना व्हायरसची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तर हजारो लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला हजर राहिलेल्या अनेकांचा शोध घेतला जात आहे. दिल्लीतील निझामुद्दीन हे ठिकाण करोनाचं हॉटस्पॉट झालं असून २००० लोकांना यामुळे करोनाची लागण झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारे या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्यांना पुढे येऊन माहिती द्यावी असं आवाहन केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tablighi jamaat event scheduled in vasai cancelled by maharashtra police sgy
First published on: 03-04-2020 at 10:36 IST