संदीप आचार्य

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टप्प्याटप्प्याने निर्बंध हटवताना योग्य खबरदारी घेतल्यामुळेच राज्यातील व मुंबईतील करोनाची रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे. त्याचवेळी अनेक युरोपियन देशांनी निर्बंध हटवताना योग्य खबरदारी न घेतल्याचा मोठा फटका आज त्या देशांना बसत असून यातील काही राष्ट्रांनी लॉकडाउनसह चर्च प्रवेशाला बंदी लागू करण्यासह करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी अनेक कठोर बंधन लागू केल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

महाराष्ट्रात मंदिरे उघडण्यासाठी भाजपने घंटानाद केला पण गोवा, कर्नाटक, गुजरात आदी भाजपशासित राज्यातही धार्मिक स्थळे बंद आहेत यामागे करोना पसरू नये तसेच सर्वसामान्य माणसांचे हकनाक बळी जाऊ नयेत हिच भूमिका आहे. नेमकी हीच सावध भूमिका महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असता भाजपने त्याचे राजकारण केल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात करोना रुग्णांची व मृत्यूंची संख्या जास्त असल्याने राज्यात कमालीची सावधानता बाळगणे गरजेचे होते. यामुळेच अनेक निर्बंध मागे घेताना सखोल विचार करावा लागत होता.

‘माझे आरोग्य माझी जबाबदारी’ या मुख्यमंत्र्यांच्या योजनेचे दृष्य परिणाम आज दिसत आहेत. अनेक कोमॉर्बिड रुग्ण शोधून उपचार करता आले. अनेक नव्या करोना रुग्णांवर वेळेत उपचार करून त्यांचा जीव वाचवता आल्याचे अनिल परब यांनी सांगितले. करोना च्या गेल्या सात महिन्यात टाळेबंदी उठविण्यापासून झोनबंदी मागे घेण्यापर्यंत तसेच उद्योग व्यवसायांना टप्प्या टप्प्याने परवानगी देताना वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचे तसेच आरोग्य यंत्रणेबरोबर संवाद साधून निर्णय घेतले गेले. हॉटेल- रेस्तराँ सुरु करण्याबाबत तसेच जिम सुरु करण्यासाठी नियमावली बनविण्यामागे पुन्हा करोना पसरु नये तसेच करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागू नये हिच मुख्यमंत्री ठाकरे यांची सावध भूमिका होती असे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितले.

नेमकी ही सावधगिरी युरोपातील अनेक देशांनी बाळगली नाही व त्याची किंमत आज त्यांना चुकवावी लागत आहे. स्वीडन, बेल्जियम, इटाली, फ्रान्स, प्राग, चेक रिपब्लिक, वेल्स अशा अनेक देशांनी वा देशातील भागांवर पुन्हा एकदा टाळेबंदी तसेच कठोर निर्बंध लागू करण्याची वेळ आल्याचे टास्क फोर्सचे सदस्य व कॉलेज ऑफ फिजिशियनचे डिन डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. वेल्समध्ये १७ दिवसांची कडक टाळेबंदी लागू करण्यात आली आहे तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. बेल्जियम मध्ये एक महिन्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले असून मध्यरात्रीपासून पाहाटे पाचपर्यंत बंदी लागू केली आहे. रात्री आठनंतर मद्यविक्रीला बंदी लागू करण्यात आली आहे.

चेकोस्लोव्हाकिया मध्ये देशव्यापी टाळेबंदी लागू करण्यात आली असून स्वीडनमध्ये रद्द केलेली टाळेबंदी पुन्हा लागू करण्यात आली आहे. फ्रान्समधील नऊ शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून युरोपमधील अनेक देशांनी योग्य काळजी न घेतल्याचा मोठा फटका त्या देशांना पुन्हा बसल्याचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. धार्मिक स्थळांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक जातात आणि त्यातून करोना पसरल्याचे लक्षात आल्यानेच अनेक देशांनी पुन्हा धार्मिक स्थळांमध्ये जाण्यावर निर्बंध लागू केल्याचे टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी सांगितले.

राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनीही नेमके हेच मत व्यक्त केले असून महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी निर्बंध मागे घेतना सावधानता बाळगलीच पाहिजे असे ठामपणे सांगितले.महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या गेल्या पंधरा दिवसात वेगाने कमी होत आज ५९८४ नवीन रुग्ण आढळून आले तर १२५ लोकांचा मृत्यू झाला. मुंबईतही रुग्ण संख्या जवळपास निम्म्याने कमी होऊन १२३४ एवढी झाली तर ४३ जणांचे मृत्यू झाले. पुणे, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद सह राज्याच्या वेगवेगळ्या भागातील करोना रुग्णांची संख्या घटत असून योग्य खबरदारी घेतली नाही तर ती पुन्हा वाढू शकते असा इशारा टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी दिला आहे.

देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या होत आहेत. आजघडीला राज्यात ८१,८५,७७८ चाचण्या झाल्या असून यात १९.५६ लोक करोना पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे करोना बाबत मुख्यमंत्री शंभर टक्के पारदर्शक असून अनेक राज्यातील चित्र याबाबत वेगळे असल्याचे अनिल परब म्हणाले. प्रत्येक निर्बंध मागे घेताना कमालीची सावधानता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळगत असल्यानेच युरोपमधील देशांसारखी परिस्थिती आपल्याकडे निर्माण झाली नाही व होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.