सोलापुरात बुधवारी करोनाची बाधा झालेले आठ नवे रूग्ण आढळून आले. यातील एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधा झालेल्यांपैकी तीन पोलिसांचा समावेश आहे. आतापर्यंत करोनाबाधित रूग्णांची संख्या १५३ तर मृतांची संख्या दहापर्यंत गेली आहे. आज बुधवारी आढळून आलेले सर्व रूग्ण पुरूष असून बहुसंख्य दाट लोकवस्त्यांसह झोपडपट्टी परिसरात राहणारे आहेत.

करोनाने बळी घेतलेल्या पोलीस हवालदाराचे वय ५७ वर्षांचे होते. येत्या काही महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात ते सध्या नेमणुकीस होते. त्याला काही दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले होते. करोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती. मात्र, चाचणी अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच काल रात्री त्यांचा मृत्यू झाला.

आज दुसऱ्या दिवशी अहवाल प्राप्त झाला असता त्यात मृत हवालदाराला करोनाची बाधा झाली होती, हे स्पष्ट झाले. यापूर्वी, सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील तीन पोलिसांना करोनाबाधा झाली आहे.