हर्षद कशाळकर

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धास्तावलेले मुंबईकर नोरकदार चालत कोकणाच्या दिशेने निघाले आहेत. मिळेल त्या मार्गाने दररोज हजारो कुटुंब पायपीट करत रायगड जिल्ह्य़ातील विविध भागात दाखल होत आहेत. या प्रवासात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

मुंबईत करोनाचा प्रभाव दिवसागणिक वाढत आहे. टाळेबंदीमुळे बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे हे मुंबईकर मिळेल त्या मार्गाने तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. आपला गाव बरा या भावनेतून हे सर्व जण कोकणच्या दिशेने निघाले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर सध्या ठिकठिकाणी या नागरिकांचे जथ्थे पाहायला मिळत आहेत. महामार्गाप्रमाणेच रेल्वेमार्गावरून चालत काही जण गावागावात दाखल झाले आहेत. काहींनी मच्छीमार बोटींच्या मदतीने गाव गाठण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.  महामार्गावरील हॉटेल्स आणि दुकाने बंद आहेत. त्यामुळे या लोकांची अन्न-पाण्याची व्यवस्था सध्या होत नाही. रणरणत्या उन्हात त्यांची वाटचाल सुरू आहे. टाळेबंदीत आहे तिथेच राहा, तुमची व्यवस्था केली जाईल असे आवाहन सरकारच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे. मात्र हा सल्ला ऐकण्याच्या मन:स्थितीत हे लोक नाहीत.

गावात दाखल होणाऱ्या या नागरिकांकडे संशयाने बघितले जात आहे. वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले जात आहे. काही ग्रामपंचायतींनी या लोकांच्या राहण्याची तसेच जेवणाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. १५ दिवस विलगीकरणात राहा असा सल्ला दिला जात आहे.

मुंबईतून अनेक जण गावाकडे येत आहेत. त्यांना रोखणे शक्य नाही. ही गावेही त्यांचीच आहेत. येणाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, अनेक ग्रामपंचायती पुढाकार घेऊन या सर्वाची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था करत आहेत. त्यांनी १५ दिवस तिथे राहावे आणि नंतर गावात आपआपल्या घरी जावे.

– राजा केणी, शिवसेना तालुकाप्रमुख अलिबाग

मुंबईतून रायगड जिल्ह्य़ात दाखल होणाऱ्या कुटुंबांची संख्या खूप मोठी आहे. हे सर्व जण परत मुंबईत जातील अथवा नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे  या कुटुंबांचे गावागावात व्यवसाय देऊन पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना द्यावी लागेल. नाही तर या विस्थापित कुटुंबांची परिस्थिती अधिकच बिकट होईल. आमची संस्था यासाठी आगामी काळात काम करेल.

– तुषार इनामदार, महाव्यवस्थापक स्वदेश फाऊंडेशन