दूरसंचार विभागाच्या तारापूर, पालघर बीएसएनएल केंद्रांसह जिल्ह्य़ातील सुमारे २५-३० टेलिफोन एक्स्चेंज (दूरध्वनी केंद्र) ची वीजदेयके भरली न गेल्याने या दूरध्वनी केंद्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्य़ातील सुमारे आठ ते दहा हजार दूरध्वनी ठप्प झाले आहेत. याच बरोबरीने बीएसएनएलची मोबाइल व इंटरनेट सेवा खंडित झाली असून तारापूर अणुऊर्जा केंद्रासह अनेक बँका, शासकीय कार्यालय व खासगी आस्थापनाना याचा फटका बसला आहे.

पालघर जिल्ह्य़ातील सफाळेपासून ग्रामीण पट्टय़ातील वेगवेगळ्या दूरध्वनी केंद्रांची सुमारे १५ ते २० लाख रुपये इतके वीज बिल भरणा करणे आवश्यक होते. वीज देयके भरण्याची अंतिम मुदत संपल्याने महावितरण कंपनीने या सर्व केंद्रांचा वीजपुरवठा खंडित केला. काही ठिकाणी जनरेटरच्या आधारावर काही तास सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न बीएसएनएलचे अधिकारी व कर्मचारी यांनी केला, मात्र दुपारनंतर जिल्ह्य़ातील सुमारे आठ ते दहा हजार बीएसएनएल ग्राहकांची सेवा ठप्प झाल्याची माहिती पुढे आली आहे. बीएसएनएलच्या दूरध्वनी सेवेबरोबर इंटरनेट व मोबाइल सेवा खंडित झाल्याने वेस्टर्न टेलिकॉम रिजन (डब्ल्यू टी आर) द्वारा इतर राज्यांना जोडणारी दूरध्वनी सेवादेखील खंडित झाली आहे.

केंद्र शासनाची दूरसंचार यंत्रणा कोलमडली असून खासगी मोबाइल कंपन्यांना चालना मिळण्यासाठी अशा प्रकारची गैरसोय निर्माण केली जात असल्याचा आरोप सर्वसामान्य ग्राहक करत आहेत. याच बरोबरीने पालघर जिल्ह्य़ातील तारापूर अणुऊर्जा केंद्र, भाभा अणू संशोधन केंद्र, तटरक्षक दल व सागरी पोलीस स्टेशन यांची दूरध्वनी सेवा पूर्णपणे खंडित झाली आहे. यासंदर्भात बीएसएनएलचे कल्याण विभागाचे मुख्य व्यवस्थापक हरिओम सोलंकी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याविषयी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

पालघर जिल्ह्य़ातील बंद पडलेले काही प्रमुख दूरध्वनी केंद्र

आगरवाडी, एडवण, सफाळे, केळवे रोड, केळवे, पालघर, साईनगर, उमरोळी, खारेकुरण, मनोर, तारापूर, नागझरी, नवापूर, मुरबे, सिडको, तारापूर एमआयडीसी, तारापूर गाव, पाच मार्ग, सरावली, दांडी, टॅप्स, पालघर, डहाणू, धाकटी डहाणू, डेदाळे, घोलवड, चारोटी, उधवा, तलासरी, वाणगाव, आच्छाड, बोर्डी, चिंचणी, चिखला, धुंधलवाडी, गंजाड, सरावली, उधवा, वरोर, झाई.