राजयगड जिल्ह्यात येत्या २४ तासांत वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी हा पाऊस होण्याचा अंदाज आहे. एएनआयने ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.

ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबई वेधशाळेने रायगड जिल्ह्यातील विविध भागात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह २१ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे आठ वाजल्यापासून २२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे आठ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शनिवारी मुंबईसह राज्यात साधारण पाऊस झाला. या पावसामुळे राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर आणि दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांवर याचा परिणाम झाला. शहरांमध्ये ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामनाही नागरिकांना करावा लागला. मुंबईबरोबरच महाराष्ट्रातील अमरावती, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्येही साधारण पाऊस झाला होता.

दरम्यान, मुंबईसह पुणे, सांगली, सातारा आणि नाशिक जिल्ह्यात येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता स्कायमेट या खासगी वेधशाळेने वर्तवली आहे.