करोनाकाळात वाहतूक पोलिसांच्या कारवाईतील ढिलाईमुळे वाहनचालकांची मजल; वाहतूक पोलिसांच्या कारवाईत अडथळे

प्रसेनजित इंगळे, लोकसत्ता

विरार : वाहनाच्या क्रमांक पाटीवर (नंबरप्लेट) हवे तसे बदल करून त्याआधारे स्वत:चे वा आवडत्या व्यक्तीचे नाव कोरणाऱ्यांच्या वा विशिष्ट निशाणी मिरविणाऱ्यांच्या संख्येत करोनाकाळात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. गेल्या आठ महिन्यांत वाहतूक पोलिसांनी कारवाईत ढिलाई दाखविल्याने अशा प्रकारांना ऊत आल्याच्या तक्रारी काही जागरूक नागरिकांनी केल्या आहेत.

चारचाकी आणि दुचाकी चालक वाहनासाठी विशिष्ट क्रमांक मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. हा क्रमांक मिळविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन खात्याकडे आग्रह धरला जातो. त्यासाठी जास्तीत जास्त रक्कम मोजण्याची तयारी दर्शविली जाते. अशा वाहन क्रमांकांच्या विशिष्ट आकारातून दादा, भाई, आई, मामा, वाघ, भाऊ, शेर, असे रूपांतर केले जात आहे. सध्या वसई-विरार शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक नियमांची मोडतोड करून दुचाकी आणि चारचाकी रस्त्यावर फिरत आहेत. सध्या अशा दुचाकीस्वारांमध्ये चढाओढच लागली आहे. इतरांचे लक्ष आकर्षून घेण्यासाठी काही दुचाकीस्वार हा सारा खटाटोप करीत असल्याचे एका नागरिकाने सांगितले.

विशिष्ट क्रमांकाच्या आधारे नावे तयार करणाऱ्यांचीही सध्या चलती आहे. अनेकांनी असे व्यवसाय सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. काही वाहनचालकांनी तर क्रमांक पाटीवरील आकडय़ांचा आकार कमीजास्त करण्याचा सपाटा लावला आहे.  यात पाटीवरील मूळ क्रमांक झाकला गेला आहे. त्यामुळे कारवाईत अडथळे निर्माण होत आहेत. यासंदर्भात वसई-विरारमधील काही जागरूक नागरिकांनी वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत.

गुन्ह्य़ातही वापर

वाहन क्रमांक किती आकाराचा असावा, त्याची दृश्यमानता किती असावी. याविषयी काही नियम आहेत. त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, त्यात बदल केल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. अशा दुचाकी वा चारचाकी अनैतिक कामांसाठीही वापरल्या जाण्याची धोका अधिक आहे. अशी घटना नालासोपारा येथे ़घडली होती. तुळींज पोलिसांनी अटक केलेल्या दोन सोनसाखळी चोरांकडे अशा पद्धतीची क्रमांकपाटी असलेले  वाहन आढळून आले होते. अनेकदा अशी वाहने अपघात करून निसटल्यानंतर त्यांचा नेमका क्रमांक तक्रारीत नोंदवता येणे अवघड होऊन जाते. त्यामुळे अशा क्रमांकाची पाटी असलेल्या वाहनांवर कारवाईची मागणी होत आहे. या संदर्भात वाहतूक पोलिसांना कारवाईसाठी सूचित केले जाईल, असे परिवहन अधिकारी प्रकाश बागडे  यांनी सांगितले.