गडचिरोलीत गेली पाच वर्षे पराभवाची सल जोपासणारे भाजपचे अशोक नेते यांच्या पदरात यावेळी मतदारांनी भरभरून कमळे टाकली. या मतदारसंघात मोठय़ा संख्येने असलेला आदिवासी समाजही मोदी लाटेवर स्वार झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीसमोर भविष्यात मोठे संकट उभे ठाकले आहे.
नक्षलवादग्रस्त असा राज्यातील एकमेव मतदारसंघ, अशी गडचिरोली-चिमूरची ओळख आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात गेल्यावेळी काँग्रेसने अखेरच्या क्षणी भाजपच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला होता. अवघ्या ३० हजार मतांनी पराभूत झालेले अशोक नेते यावेळी पुन्हा रिंगणात होते. यावेळी ते मोठय़ा फरकाने विजयी होतील, असा अंदाज आधीपासूनच बांधला जात होता. मोदी लाटेमुळे मताधिक्याचा हा फरक तब्बल अडीच लाखावर पोहोचला. मारोतराव कोवासे निष्क्रीय म्हणून काँग्रेसने त्यांना घरी बसवून आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांना रिंगणात उतरवले. त्यामुळे काहीच फरक पडला नाही. विधानसभेत फारशी प्रभावी कामगिरी बजावू न शकलेले डॉ. उसेंडी प्रचाराच्या काळात त्यांच्या कोटय़वधीच्या बंगल्यामुळेच जास्त चर्चेत राहिले. त्या तुलनेत अजूनही भाडय़ाच्या घरात राहणाऱ्या अशोक नेतेंच्या पारडय़ात मतदारांनी वजन टाकले.
या मतदारसंघात कागदावर तरी काँग्रेसची स्थिती अतिशय मजबूत होती. ६ पैकी ४ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार होते. मात्र, या आमदारांविषयी सुद्धा जनतेच्या मनात रोष होता. तोच या निकालात दिसून आला. आमदार विजय वडेट्टीवार, डॉ. नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम व रामरतन राऊत या तिघांच्या मतदारसंघात भाजपने निर्णायक आघाडी घेतली. आमदारांविषयी जनतेच्या मनात असलेला राग प्रचाराच्या काळात स्पष्टपणे दिसत होता. तरीही काँग्रेसच्या वतीने वडेट्टीवारांच्या स्वप्नपूर्तीसाठी उसेंडींना मते द्या, अशी जाहिरात केली गेली. त्यामुळे उसेंडी पुढे जाण्याऐवजी आणखी मागे गेले. या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकत बऱ्यापैकी आहे. या ताकतीची साथ मिळावी म्हणून काँग्रेसने अहेरीत राजे धर्मराव आत्राम यांची मदत घेतली. सोबतच त्यांना पराभूत करणारे व काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले आमदार दीपक आत्राम यांचीही मदत घेतली. यामुळे उडालेल्या गोंधळात अखेर मतदारांनी भाजपच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला.
भामरागडसारख्या दुर्गम भागात सुद्धा भाजपला भरभरून मते मिळाली. या मतदारसंघात आदिवासी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. हा मतदार काँग्रेसचा पारंपरिक म्हणून ओळखला जातो. यावेळी आदिवासी सुद्धा मोदी लाटेवर स्वार झाल्याचे दिसून आले. नक्षलवादाच्या समस्येमुळे या मतदारसंघात विकास नाही. आता अशोक नेते यांना सत्ताधारी खासदार असल्याचा फायदा घेत या भागाला विकासाच्या प्रक्रियेत आणावे लागणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसमय झालेल्या या मतदारसंघात आता मोदी लाटेमुळे प्रचंड उलथापालथ झाली असून अनेक विद्यमान आमदारांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
मतदारांना गृहीत धरणे कसे धोक्याचे असते, हे या विजयाने काँग्रेसला दाखवून दिले आहे. या निकालामुळे मुलीला गडचिरोलीतून आणि स्वत:ला अहेरीतून विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात असलेल्या धर्मरावबाबा आत्रामांना मोठा धक्का बसला आहे.