खंडणीसह वेगवेगळ्या गुन्ह्यांत झोपडपट्टी दादा कायद्यान्वये स्थानबद्ध केलेल्या अरुण बोर्डे यास औरंगाबादच्या कारागृहातून हलवावे, असा प्रस्ताव पोलिसांनी पाठविला असतानाच काही राजकीय पुढाऱ्यांनी त्याला निवडणुकीच्या तोंडावर सोडवून आणण्यासाठी मोठी यंत्रणा लावली आहे. उद्या त्याच्या सुटकेचे आदेश धडकतील, अशी चर्चा पोलीस दलातच सुरू आहे. कारागृहात बोर्डे राहू नये, या साठी राष्ट्रवादीचे काही नेते कार्यरत होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत बोर्डे याच्यावर १३ गुन्हे दाखल आहेत. बहुतांशी आर्थिक व्यवहारांत खंडणी व धमकी दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दादागिरीच्या कलमान्वये त्याची कारागृहात रवानगी केली जावी, या साठी तत्कालिन पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी विशेष प्रयत्न केले होते. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक केले जात होते. मात्र, त्याच्या सोडवणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करीत होते. मात्र, तेव्हा सुरू असणाऱ्या प्रयत्नांची माहिती जनतेपर्यंत पोहोचल्यास बदनामी होईल, असे वाटल्याने काही दिवस हे प्रकरण रेंगाळत ठेवण्यात आले. ऐन निवडणुकीत मतांचे गणित घालून बोर्डेला कारागृहाच्या बाहेर आणण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू झाले. त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरूअसतानाच बोर्डेला वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात आणले होते. तेव्हा त्याला अनेकजण भेटण्यास आल्याची माहिती पोलिसांकडे होती. या पाश्र्वभूमीवर १० दिवसांपूर्वी त्याला हर्सूल कारागृहातून हलविण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग यांनी पाठविला होता. त्यावर कारागृह अधीक्षकाचे अभिप्रायही मागविण्यात आले. एकीकडे असे प्रयत्न सुरू असतानाच त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात आहेत. या सुटकेसाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.