भाजपा नेते जयभगवान गोयल लिखित ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावर राज्यभरात वादळं उठलं आहे. ठिकठिकाणी या पुस्तकावरुन टीका-टिपण्णी सुरु झाली असून अनेक शिवप्रेमींनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच विविध राजकीय नेत्यांनीही यावर भाष्य केले आहे. मात्र, खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी अद्याप यावर भाष्य केलं नव्हतं. मात्र, आता या वादावर ते उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष उदयनराजेंच्या भूमिकेकडे लागले आहे.

उदयनराजे भोसले यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावर उद्या मंगळवार, दि. १४ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता रेसिडन्सी क्लब, पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन सडेतोडपणे आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत.

दरम्यान, छत्रपती शिवरायांचे वंशज राज्यसभेचे खासदार आणि भाजपाचे सदस्य असलेले संभाजीराजे यांनी यावर आपली भुमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, “मोदींबाबत आदर आहे त्यांचं कर्तृत्व मोठं आहे पण याचा अर्थ असा होत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांची तुलना व्हावी. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तर कुणाचीही तुलना होऊ शकत नाही. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी याची खबरदारी घ्यावी की हे पुस्तक बाजारात येणार नाही. याचे कारण याचे प्रकाशन भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झाले आहे,”

संभाजीराजेंच्या या प्रतिक्रियेपूर्वी ट्विटरवरुन प्रतिक्रिया देणाऱ्या खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. राऊत यांनी याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या संभाजीराजे आणि सातार्‍याच्या गादीचे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी याबाबत भूमिका घ्यावी असे म्हटले होते. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर संभाजीराजे यांनी राऊत यांना सुनावले होते. राऊत यांनी जबाबदारीने लेखन केलं पाहिजे त्यांनी तसे न केल्यामुळे माझ्यासारखा संयमी माणूसही चिडला आहे, असे ते म्हणाले. चर्चा व्हावी ती पुस्तकाबाबत आणि बाजारात न येऊ देण्याबाबत, या विषयात राजकारण करायला नको असे आवाहन संभाजीराजे यांनी केले होते.