प्रकाश आंबडेकर यांचे मेळाव्यात आवाहन

नगर : ज्ञानोबा व तुकोबापेक्षा मनू श्रेष्ठ असल्याचे सांगत संभाजी भिडे यांनी दोन विचारसरणीत भांडणे लावण्याचे कारस्थान सुरू केले आहे, याविरोधात वारकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज, मंगळवारी नगरमध्ये बोलताना केले.

आंबेडकर यांच्या उपस्थितीत आज नवीन टिळक रस्त्यावरील माउली मंगल कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार लक्ष्मण माने, अ‍ॅड. विजय मोरे, माजी आमदार हरिभाऊ भदे, प्रा. किसन चव्हाण, डॉ. अरुण जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

संभाजी भिडे यांना मुख्यमंत्र्यांचे अभय असल्यानेच त्यांच्यावर कारवाई होणार नाही, आरएसएस भिडेंच्या माध्यमातून बोलत आहे, भाजप व आरएसएस आज संविधान बदलाची घोषणा करत आहेत. परंतु आम्हाला संविधान वाचवायचे आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत धनगर, माळी, मुस्लिम, भटके विमुक्त, ख्रिश्चन यांना कधी सत्ता मिळालीच नाही, राईनपाडाच्या घटनेनंतर आमचा स्वातंत्र्यावरचा व राजकीय पक्षांवरचा विश्वास उडाला आहे, निवडणुकीतून केवळ घराणेशाही जोपासली गेली, आता आम्हाला आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी सत्ताधारी बनायचे आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भटके विमुक्त, माळी, धनगर आदी समाजाला ५० जागा दिल्या जाणार आहेत. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीची जिल्हा, तालुका अशी बांधणी होणार आहे. ही वाट खडतर आहे, आघाडीत कोणी लहान किंवा मोठा नसेल, आता जबाबदारी तुमची आहे, एक राहिला नाहीतर मनुवाद्यांना सहकार्य होईल व हुकूमशाह जन्माला येईल, असे आंबेडकर म्हणाले.

मोदींच्या विरोधात बोलले तर गुन्हे दाखल केले जातात, मात्र मी विरोधात बोलणारच, लोकशाहीने, घटनेने दिलेला तो हक्क आहे, असे सांगून आंबेडकर म्हणाले की, निवडून आलेले मालक नाहीतर निवडून देणारे आम्ही मालक आहोत, गेल्या ७० वर्षांत राजकीय पक्षांना आमच्याविष़ी पाझर फुटलेला नाही, भटक्या विमुक्तांचा केवळ लोणच्यासारखा वापर झाला. सर्व छोटय़ा समूहांना यापुढे एकत्र बांधले जाणार आहे, जे विकासापासून वंचित राहिले ते केंद्रबिंदू असतील तर विकसित जाती दूर ठेवल्या जातील. गंगा आता उलटी वाहायला हवी आहे. यावेळी बी. आर. शेंडगे, काशिनाथ चौगुले, सपान महापूर, बाबुराव सुर्वे, संजय खामकर, अनंत लोखंडे, अर्जुन सरपते, शिवाजी गांगुर्डे, मीरा शिंदे, पुनम शिंदे, नीलिमा बंडेलु, मौलाना इस्माईल नकवी, अर्शद शेख, अरविंद सोनटक्के, खासेराव शितोळे, साहेबराव पाचारणे, दत्तात्रेय आगे आदींची भाषणे झाली.