वाहनचालक, प्रवाशांना आणखी सव्वा वर्ष वाहतूक कोंडीचा त्रास

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पुलाच्या कामाला ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे होणारा वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालक, प्रवाशांना आणखी सव्वा वर्ष सहन करावा लागणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग हा मुंबई, ठाणे, वसईला  जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे.  दररोज या महामार्गावरून मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या महामार्गावरील  जुन्या वर्सोवा पुलाच्या शेजारीच नवीन वर्सोवा पूल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतले आहे. या कामाची सुरुवात ही २०१८ मध्ये करण्यात आली होती.  १८ फेब्रुवारी २०२१ रोजी या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार होते. परंतु उद्भवलेली करोनास्थिती  व संथगतीने सुरू असलेले कामकाज यामुळे या पुलाचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. या कामाला विलंब होत असल्याने येथील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तर  दुसरीकडे वाहतूक कोंडीमुळे महामार्गालगतच्या असलेल्या ससूनवघर, मालजीपाडा, ससूपाडा, बोबतपाडा, पठारपाडा, यासह अनेक खेडय़ापाडय़ांना अडचणी निर्माण होत असतात.   हे काम अजून किती काळ चालेल याबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सुशांत पाटील यांनी माहिती अधिकार टाकून माहिती मागविली होती. यामध्ये या पुलाच्या कामाला सद्यस्थितीत मुदत वाढ दिली असून ३० जून २०२२ रोजी या पुलाचे काम पूर्ण होणार आहे असे लेखी स्वरूपात कळविले आहे.  म्हणजेच जवळपास १ वर्षे ४ महिने इतका कालावधी लागणार आहे.यामुळे येथील नागरिकांचा मनस्ताप आणखीन वाढणार आहे.

‘वाहतूक नियोजन करा’

वर्सोवा पुलाचे काम आता लांबणीवर पडले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना भेडसावत असलेली वाहतूक कोंडीची समस्या कायम राहिली आहे.  यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतुकीसाठी आराखडा तयार करून  रुग्णवाहिका, परिवहन सेवा,  इतर वाहने, मालवाहतूक वाहने, यांचे योग्य नियोजन करावे अशी मागणी भूमिपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष  सुशांत पाटील यांनी महामार्ग पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना होणारा वाहतूककोंडीचा त्रास कमी करता येईल. यासाठी आम्ही स्थानिकही वाहतूक पोलिसांना सहकार्य करू असेही पाटील यांनी सांगितले आहे.

वर्सोवा पुलाच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली  व त्यानुसार  काम सुरू आहे. वाहतूक कोंडीची समस्या पालघर आणि ठाणे या दोन जिल्ह्यंना जोडणारी असल्याने त्या त्या विभागातील अधिकारी यावर उपाययोजना करू शकतात.

-दिनेश अग्रवाल, व्यवस्थापक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण