सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या घोडेबाजाराच्या पार्श्वभूमीवर मतदान न करण्याचा आदेश देऊनही मतदान केल्याप्रकरणी सोलापुरात माकपच्या दोन नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. माकपचे प्रदेश सचिव आणि माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी ही माहिती दिली. विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील सात जागांसाठीचे निकाल बुधवारी जाहीर झाले होते. यामध्ये सोलापूरमधुन भाजप-शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीच्या दिपक साळुंखे यांना धूळ चारली होती. प्रशांत परिचारक यांचा २४१ मतांनी विजय झाला होता. या निवडणुकीत माकपच्या माशप्पा विटे आणि महादेवी अलकुंटे या दोन नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून मतदान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली. सोलापूर महापालिकेत माकपचे एकूण तीन नगरसेवक आहेत.