वाहनचालकांना त्रास; पर्यायी मार्गाचा वापर

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : जिल्ह्य़ातील दुर्गम भागात जाणाऱ्या पालघर- जव्हार- त्रंबकेश्वर- घोटी- सिन्नर या मार्गाला दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला गेला होता. या रस्त्याच्या देखभाल- दुरुस्तीवर गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर सुमारे पावणेचार कोटी रुपये खर्च झाले असले तरीदेखील या रस्त्याची दैना कायम राहिली आहे. यामुळे जव्हारकडून पालघर मुख्यालयाकडे येणाऱ्या वाहनांना त्रास होत असून अनेकदा पर्यायी मार्गाचा आसरा घ्यावा लागत आहे.

पालघर-सिन्नर या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग १६०-अ म्हणून घोषित केल्यानंतर या मार्गाचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र २०१८-१९ तसेच २०१९-२० दरम्यान राष्ट्रीय महामार्गाकडून या रस्त्याच्या देखभाल- दुरुस्तीसाठी प्रथम आर्थिक तरतूद आणि त्यानंतर कामांना तांत्रिक मान्यता न मिळाल्याने सुमारे २०-२२ किलोमीटर लांबीच्या मनोर- विक्रमगड पट्टा खड्डेमय झाल्याने या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग तीन कोटी ६९ लाख रुपये खर्च करून दुरुस्ती- डागडुजी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. याप्रकरणी जुलै २०१९ मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती, तरीसुद्धा प्रत्यक्ष काम फेब्रुवारी- मार्च २०२०च्या दरम्यान झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते. त्यामुळे संपूर्ण पावसाळा व हिवाळ्याच्या काळात विक्रमगडला पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जानेवारी २०१९ मधील २२ किलोमीटरच्या या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी करिता १५.३७ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. मात्र हे काम वर्ग न होता पुन्हा ऑक्टोबर २०१९ मध्ये होईल अशाच प्रकारची निविदा काढून ते काम १९.५४ कोटी रुपयांच्या किमतीमध्ये देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. मार्च २०२० मध्ये या रस्त्याच्या दुरुस्तीवर पावणेचार कोटी रुपये खर्च झाला असताना पुन्हा वाढीव किमतीची निविदा काढणे आवश्यक होते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मार्च महिन्यात देखभाल- दुरुस्तीची कामे झालेली असताना पावसाचे अवघ्या दीड महिना उलटल्यानंतर हा रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे. या मार्गावर सावरखंड, भोपोली, चिंचघर, पाचमाड, बोरांडा, उपराळे, टेटवाली, सवादे आणि विक्रमगड नाका या परिसरांत खड्डय़ांचे प्रमाण अधिक आहे.

पालघर ते त्र्यंबकेश्वर या राष्ट्रीय महामार्गाचा देखभाल- दुरुस्तीचा ठेका देण्यात आला असून या वर्षी संबंधित ठेकेदाराकडून या रस्त्यावर पडणारे खड्डे बुजवण्यात येणार आहेत. पावसाळा सुरू असताना खडी, मेटल व ग्रिट पावडरने खड्डे भरून तसेच पावसाळा संपल्यानंतर डांबर अंथरून त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे.

– दिनेश महाजन, कार्यकारी अभियंता, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ठाणे</strong>

विनाअनुदानित तुकडय़ांबाबतचा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या तुकडय़ा सुरू करण्यात आल्या आहेत.

– जे. जे. खोत, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती वाडा.