मुंबई/वाई : येस बँक, एचडीआयएल घोटाळ्यातील प्रमुख आरोपी कपिल आणि धिरज  वाधवान यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने रविवारी ताब्यात घेतले. दरम्यान, वाधवान बंधू आणि त्यांच्या निकटवर्तीयांना संचारबंदीच्या काळात खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास करण्याची परवानगी देणारे गृह विभागाचे प्रधान सचिव(विशेष) अमिताभ गुप्ता यांनी हे पत्र कोणत्याही राजकीय दबावाविना दिल्याची कबुली दिली आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण ते पत्र दिल्याचे गुप्ता यांनी चौकशी समितीसमोर सांगितल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी दिली.

वाधवान बंधू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी संचारबंदीच्या काळात केलेल्या प्रवासाचे वृत्त समोर आल्यानंतर सातारा जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पाचगणी येथील विलगीकरण केंद्रात त्यांची रवानगी केली होतील. त्यांच्या विलगीकरणाचा कालावधी २२ एप्रिल रोजी संपताच पोलीस बंदोबस्तात या सर्वाना महाबळेश्वर येथील वाधवान यांच्या ‘दिवाण व्हिला’ या निवासस्थानी हलवण्यात आले. त्यांना ५ मे पर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय सातारा जिल्हा न सोडण्याचा आदेश सीबीआय न्यायालयाने दिला होता. तर  ६ मे पर्यंत जिल्ह्याबाहेर न जाण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला होता. मात्र, सीबीआयच्या विनंतीवरून स्थानिक न्यायालयाने शनिवारी ही स्थगिती उठवली. त्यानंतर सीबीआयने रविवारी वाधवान बंधूंना ताब्यात घेतले. दोन वाहनांतून आलेले सीबीआयचे पथक या दोघांना घेऊन रविवारी दुपारी मुंबईकडे रवाना झाले. या दोघांनाही सोमवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येईल.

वाधवान यांचे कुटुंबीय आणि अन्य १४ जणांना तुर्तास महाबळेश्वर येथेच ठेवण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान महाबळेश्वर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अमिताभ गुप्ता यांची कबुली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाधवान कुटुंबीयांच्या खंडाळा ते महाबळेश्वर या प्रवासाप्रकरणी चौकशी करत असलेले वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनीदेखील रविवारी याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी सायंकाळी समाजमाध्यमावरून या अहवालाबाबत माहिती दिली. गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वर येथे जाण्याची परवानगी देणारे पत्र दिल्याचे मान्य केले आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. हे पत्र देण्यासाठी आपल्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केल्याची माहिती देशमुख यांनी दिली. हा अहवाल लवकरच सार्वजनिक करण्यात येईल, असे सांगतानाच गुप्ता यांच्यावर नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल, असेही गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.