करोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी प्रशासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून वर्धा जिल्हा प्रशासनाने शंभर दिवसात सुमारे पन्नास लाख रुपयांचा दंड वसूल करुन एक नवा विक्रम केला आहे.

राज्यात २४ मार्चला संचारबंदी सुरू झाली. त्याअंतर्गत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता दुकानांसह सर्व उद्योग बंद करण्यात आले होते. टाळेबंदीच्या काळात दुकाने, व्यवसाय, उद्योग सुरू ठेवणाऱ्या तसेच सामाजिक अंतर न पाळणाऱ्या व्यवहारांवर कारवाईचा बडगा प्रशासनाने उगारला. नियमाचे पालन न करता कामगारांकडून काम करून घेणाऱ्या उद्योगांवर दंड ठोकतानाच उद्योगाला कुलूप लावण्यात आले.

नियमांचे पालन कसोशीने होण्यासाठी महसूल, पोलीस, ग्रामविकास व नगर परिषद विभागाचे पथक तयार करण्यात आले होते. भाजी बाजार व इतर गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न झाला. अधिकाऱ्यांसोबतच स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, माजी सैनिक, एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी प्रतिबंधात्मक उपायांबाबत दक्ष होते.

शंभर दिवसाच्या कालावधीत रस्त्यावर नाहक फिरणाऱ्या व दोन व्यक्तींची वाहतूक करणाऱ्या नागरिकांची ४०२ वाहने जप्त करण्यात आली. तसेच सामाजिक अंतर न राखणे, मास्कशिवाय फिरणे, हँडवॉशची व्यवस्था नसणारी दुकाने तसेच व्यक्तींवर ४ हजार ५५५ गुन्हे दाखल करण्यात आले. अशा नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांकडून जिल्ह्यात ५० लाख ३५ हजार ५२९ रूपयांचा दंड आत्तापर्यंत वसूल करण्यात आला आहे.

वर्धा विभागात सर्वाधिक म्हणजे २९ लाख ७२ हजार रूपयाचा दंड वसूल झाला. याखेरीज २० व २१ जून रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ३ हजार ९९३ व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून दंडापोटी ७ लक्ष ९९ हजार रूपये दंड आकारण्यात आला. १ व २ जूलैला टाळेबंदीत शिथिलता दिल्यानंतर उपायांची पाहणी करण्यात आली. त्यात ५ हजार ३३९ दुकानांवर कारवाई करून १२९ दुकानांना टाळे ठोकण्यात आले. या मोहिमेत ४ लक्ष ३६ हजार रूपयाचा दंड शासनाच्या तिजोरीत जमा झाला. करोना विषाणूचा प्रार्दुभाव थांबलेला नसल्याचे निदर्शनास आणत जिल्हाधिकारी विवेक भीमनवार म्हणाले, “यावेळी नियमांचे पालन कसोशीने करण्याची गरज आहे. शारिरिक अंतर, हातांची स्वच्छता व मुखपट्यांचा वापर याचे पालन नागरिकांनी करणे अपेक्षित आहे.”