करोना आणि लॉकडाउन या गोष्टींचा फटका तर महाराष्ट्राला, देशाला बसलाच आहे. मात्र त्याही पेक्षा मोठं संकट आहे ते अर्थव्यवस्थेबद्दलचं. अर्थव्यवस्थेची घडी पुन्हा बसवणं हे सर्वात मोठं संकट आहे असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, या मुलाखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. आज या मुलाखतीचा दुसरा भाग आहे. याच भागात त्यांना संजय राऊत यांनी करोना आणि लॉकडाउन असताना राज्यावर मोठं संकट कोणतं? हा प्रश्न विचारला. त्याला त्यांनी सविस्तर उत्तर दिलं.

शरद पवार यांनी काय उत्तर दिलं?

“सध्याच्या घडीला अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणं हे मोठं आव्हान आहे. करोनाचा गंभीर परिणाम अर्थव्यवस्थेवर झालाय. शेती, त्याचं उत्पादन यासंबंधीचे व्यवहार सुरु आहेत. मात्र बाजार बंद आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांचं करायचं काय? हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. जे शेतीला पूरक असे व्यवसाय आहेत जसा दुधाचा व्यवसाय सुरुवातीच्या काळात पुरवठा बंद झाला होता. त्याचा फटका त्यांना बसला.

“महाराष्ट्राचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कारखानदारी. कारखाने गेले तीन महिने बंद आहेत. कारखानदारी संकटात आल्याने तिथे काम करणारा माणूस आपोआपच संकटात सापडला. काही कारखान्यांनी वेतन दिलं. मात्र तेपण आता हा विचार करत आहेत की असं वेतन किती दिवस द्यायचं? अनेक कारखान्यांनी तर वेतन दिलंच नाही. त्यामुळे त्या कामगारांपुढे घर कसं चालवायचं हा प्रश्न निर्माण झाला.”

“महाराष्ट्र व्यापाराचं मोठं केंद्र आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ही नगरी आर्थिक बाबतीत महत्त्वाची आहे. मात्र हे सगळे व्यवहार बंद झाले त्याचाही फटका बसला. बँकांचे व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. वाणिज्य, शेती, कारखानदारी या सगळ्यांमधले व्यवहार थंडावलेत. त्याचा परिणाम घराघरात झाला आहे” असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्राच्या जनतेने अत्यंत सामंजस्याची भूमिका घेतली आहे. सरकारची अवस्था जनतेला दिसते आहे. त्यामुळे किती हट्ट करायचा आणि किती संघर्ष करायचा हे जनतेला माहित आहे. त्यांनी सामंज्यसाची भूमिका करोना काळात घेतली आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.