लातूर, उस्मानाबादमध्ये भूकंप झाला, त्यावेळी या भागातील नागरिकांना मदत आणि त्याबरोबर धीर देणे अत्यंत महत्वाचे होते. त्यासाठी अहोरात्र फिरत होतो. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी परिश्रम घेत होतो. मात्र ज्यावेळी एकांतात असायचो, त्यावेळी भावना अनावर होत. हृदयाला पिळवटून टाकणारी परिस्थिती पाहून डोळ्याच्या कडा ओलसर होवून आपसुक अश्रू ओघळायचे, असे सांगत भूतकाळातील आठवणींमुळे शरद पवार भावुक झाले.

लोहारा तालुक्यातील बलसूर येथे भूकंपाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शरद पवार यांचा कृतज्ञता सत्कार समारोह आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

भूकंपग्रस्तांना आत्मविश्वास आणि दिलासा देण्यासाठी योगदान देणार्‍या मान्यवरांचा बलसूर येथे कृतज्ञता सत्कार आयोजित करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना यावेळी उपस्थितांसमोर बोलताना भावना अनावर झाल्या. राज्यात विसर्जन मिरवणुकीचा आढावा घेत रात्री २.३० वाजेपर्यंत मुख्यमंत्री कार्यालयात बसलो होते. बहुतेक जिल्ह्यातील मिरवणुका पार पडल्या होत्या. परभणी जिल्ह्यातील थोडी गडबड वगळता अन्य ठिकाणी गणेश विसर्जन शांततेत झाले होते. परभणीतील गडबड मिटली असल्याचा निरोप पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास आला. त्यानंतर आपण झोपण्यासाठी निघालो तोच खिडक्या जोरात वाजल्या. भूकंपाची जाणीव झाली.

तेंव्हा कोयना धरणावर भूकंप मापन यंत्रणा कार्यरत होती. तेथे तात्काळ संपर्क साधला. त्यानंतर भूकंपाचे केंद्र किल्लारी असल्याचे समजले. तातडीने विमान तयार ठेवण्याचे आदेश दिले आणि सकाळी ठीक ६ वाजता लातूर येथे पोहचलो. तेथून भूकंपग्रस्त परिसरात त्वरीत धाव घेतली. सगळीकडे हाहाकार उडाला होता. प्रेताचे खच, हृदय पिळवटून टाकणारा नातेवाईकांचा आक्रोश अशावेळी लोकांना धीर देण्यासाठी आणि जखमींवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी राबविण्यास सुरूवात केली. अन्न, पाणी, तात्पुरते निवारे आणि चांगल्या पध्दतीने गावांचे पुनर्वसन हे खरे तर आव्हान होते. यात राज्य सरकार, विविध सामाजिक संस्था आणि देशविदेशातील नागरिकांनी मोलाची कामगिरी बजावली. या परिसरातील लोक आता सन्मानाने जीवन जगत असल्याचे पाहून मोठे समाधान मिळत असल्याचे भावोद्गारही पवार यांनी काढले.

यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजीमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचा मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे मानपत्र त्यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांनी स्वीकारले.