15 August 2020

News Flash

‘शिवसेनेसोबत पुन्हा युती शक्य आहे का?’; फडणवीस यांचे सूचक उत्तर, म्हणाले…

"मला नाही वाटतं की बाळासाहेबांनी असा शब्द घेतला होता की..."

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

“शिवसेनेसाठी आम्ही कधीच दरवाजे बंद केले नव्हते,” असं सूचक वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत पुन्हा युती शक्य आहे का या प्रश्नाला उत्तर देताना केलं आहे. मात्र त्याचवेळी “आम्ही दरवाजे खुले असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला आवश्यकता नाही असं म्हटलं तर ते मान्य नाही. कारण आम्ही काय रस्त्यावर पडलेलो नाही,” असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आत्मसन्मानाला धक्का लागू न देता पुन्हा एकदा युती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असेच संकेत फडणवीस यांनी दिले आहेत. फडणवीस यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये युती तुटण्यासाठी शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप करताना हे वक्तव्य केलं.

भाजपाची दारं शिवसेनासाठी उघडी आहेत का? असा सवाल या मुलाखतीमध्ये फडणवीस यांना विचारण्यात आला असता त्यांनी थेट हो किंवा नाही असं उत्तर देणं टाळलं. “राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. पण याचा विचार शिवसेनेला करावा लागेल. कारण भाजपाने नाही तर शिवसेनेनं युती तोडली आहे. भाजपा गेला दूर नाही तर शिवसेना दूर गेली. भाजपाने सरकार तयार केलं नाही तर शिवसेनेनं तयार केलं आहे. त्यामुळे हा निर्णय शिवसेनेला करावा लागेल. आम्ही कधी दरवाजे बंदच केले नव्हते. पण आज आमचे दरवाजे खुले आहेत असं म्हणून मग त्यांनी परत त्याच्यावर म्हणायचं आम्हाला आवश्यकता नाही. तर आम्ही काही रस्त्यावर पडलेले नाही,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ऑटोरिक्षा महाविकास आघाडी सरकार

महाविकास आघाडी सरकार कधीपर्यंत सत्तेत राहील याबद्दल फडणवीस यांनी शंका उपस्थित केली आहे. “मी महाविकास आघाडी सरकारला ऑटोरिक्षाची उपमा दिली आहे. पण रिक्षाच्या वेगाला एक मर्यादा आहे. कारच्या वेगाने रिक्षा जाऊ शकत नाही. फार मजल मारु शकत नाही. छोट्या प्रवासासाठी रिक्षा चांगली असते. या ऑटोरिक्षाला पवरांनी इंजिन दिलं आहे. ही फार काळ चालेलं असं वाटतं नाही. पवार रेटण्याचा प्रयत्न करतायत बघू आता कुठंपर्यंत जाईल,” असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

तीन पायाचं सरकार कधीच टीकलं नाही

ऐतिहासिक संदर्भ देत तीन पायाचं सरकार चालत नाही अशी आठवणही फडणवीसांनी करुन दिली. “तीन पायाचं सरकार कधीच चाललं नाही. एक प्रमुख पक्षाकडे जागा जास्त असून त्याला इतरांनी पाठिंबा दिल्यास सरकार चालतं हे आपण अटलजींच्या काळात पाहिलं. पण इथे जवळजवळ समसमान जागा असणारे तीन पक्ष एकत्र आले आहेत. ५६,५४ आणि ४४ म्हणजे जवळजवळ सारख्या जागा आहेत. असं सरकार या देशाच्या इतिहासात कधीच चाललं नाही. अशा सरकारमध्ये काँग्रेस जेव्हा जेव्हा गेली तेव्हा सहा महिने, आठ महिने आणि नऊ महिन्याच्या वर काँग्रेस कधीही सत्तेत टीकली नाही असा काँग्रेसचा इतिहास सांगतो. ही एक अनैसर्गिक युती आहे,” असं फडणवीस म्हणाले.

मला नाही वाटतं की बाळासाहेबांनी असा शब्द घेतला होता की…

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची राज्यातील युती ही अनैसर्गिक असल्याची टीका करत फडणवीस यांनी बाळासाहेबांना काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्याचा शब्द उद्धव यांच्याकडून नक्कीच घेतला नसेल असा टोलाही उद्धव ठाकरेंना या मुलाखतीदरम्यान लगावला. “काँग्रेस आणि शिवसेना समान विचारसरणीच्या शोधात आहे याचा मला आनंदच आहे. पण माननीय हिंदू हृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, भाषण, लेख हे सगळं पाहिलं तर काँग्रेस आणि शिवसेना कशी सोबत येऊ शकते असा प्रश्न मला पडतो. मला उद्धवजीचं आश्चर्य यासाठी वाटतं की ते म्हणतात मी बाळासाहेबांना शब्द दिला होता. पण मला नाही वाटतं की बाळासाहेबांनी असा शब्द घेतला होता की काँग्रेससोबत जाऊन मी मुख्यमंत्री करेन. ज्या विचारधारेला बाळासाहेबांनी टोकाचा विरोध केला. बाळासाहेबांसारखे शब्द आपण उच्चारु शकत नाही पण ज्यांच्यासाठी बाळासाहेबांनी ते शब्द उच्चारले त्यांच्यासोबत जाऊन सत्ता स्थापन केली आहे,” अशी टीका फडणवीस यांनी शिवसेनेवर केली.

शिवसेनेला रोज तडजोड करावी लागणार 

शिवसेनेला आता महाविकास आघाडीमध्ये सतत तडजोड करावी लागणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. “आमच्यासोबत उद्धवजी जेव्हा होते तेव्हा मातोश्रीवरुन आदेश निघायचे आणि आम्ही पाळायचो. आता मातोश्रीवरील आदेश नाहीय. आता मातोश्री कधी सिल्व्हर ओकवर आहे, कधी नेहरु सेंटरला आहे तर कधी ट्रायडण्ट हॉटेलला आहे. अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे. आता सत्तेसाठी काँग्रेस जरी सोबत आली तरी काँग्रेसचीही अवस्था तशीच आहे. आता शिवसेनेला काँग्रेसलाही खूश ठेवायचं आहे आणि आपल्या मतदारांनाही खूश ठेवायचयं अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवसेनेने तडजोड केली आहे आणि सरकार चालवण्यासाठी रोज तडजोड करावी लागणार आहे. मूळ तत्व आता बाजूला जाणार. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ही बाळासाहेबांनी मांडलेली भूमिका कायद्यामध्ये रुपांतरित करायीच असल्यास हा विधेयक संमत होणे हा एकमेव मार्ग आहे,” अशी आठवण फडणवीस यांनी आपल्या उत्तरामधून शिवसेनेला करुन दिली.

शिवसेनेचे हिंदुत्व संपले

शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका शिल्लकच राहिली नसल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. “शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका शिल्लक राहिली नाही. ज्या हिंदुत्वाच्या मूळ तत्वांवर शिवसेना किंवा भाजपा उभी आहे ती हिंदुत्वाची तत्व ते मानणार नसतील तर ते कसले हिंदुत्ववादी. हिंदुत्ववाद नाकारुन ते औसरवाद म्हणजेच संधी मिळेल तिथे जाण्याचा निर्णय घेत असतील तर जनताच त्यांच काय करायचं ते ठरवले,” असा इशारा फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे. तसेच कर्नाटक पोटनिवडणुकींचा संदर्भ देत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला. “कर्नाटकाच्या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे. जनादेशाचा जे अपमान करतात त्यांना जनता कधीही माफ करत नाही हे कर्नाटकने स्पष्टपणे दाखून दिलं आहे,” असं फडणवीस म्हणाले.

मित्रपक्षाबरोबर निवडणूक लढवून विरोधकांबरोबर कधीच गेलो नाही

भाजपाने कधीही मित्रपक्षाबरोबर निवडणूक लढवून विरोधकांबरोबर जात सत्ता स्थापन केलेली नाही याची आठवणही फडणवीस यांनी शिवसेनेला करुन दिली. “गोव्यातील सत्तासंघर्षाबद्दल बोलायचं झालं तर गोव्यात भारतीय जनता पक्षामध्ये लोकं आले. भाजपाला १४ आणि काँग्रेसला १५ जागा होत्या. निवडणुकीआधी तिथे कोणीच युती केली नव्हती. बहुमतासाठी २१ जागा हव्या होत्या. तेव्हा लोकं भाजपाकडे आले आम्ही काँग्रेसकडून जनादेश हिरावून घेतला नाही. महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत होतं. शिवसेना वेगळी लढली असती तर आमचं काहीच म्हणणं नव्हतं. हरियाणामध्ये आम्ही चौटालांसोबत गेलो कारण आम्ही वेगवेगळे लढलो. तिथे आमच्या सहकाऱ्यांना डावलून आम्ही सरकार स्थापन केले नाहीय. आम्ही देशभरात प्रासंगिक युती केली हे खरं पण ज्यांच्यासोबत लढलो त्यांच्याच विरोधात आम्ही गेल्याचे एकही उदाहरण नाहीय. तुम्ही ज्यांच्या नावाने मते मागितली, ज्यांच्याबरोबर मते मागितली त्यांच्या विरोधात जाऊन विरोधाकांसोबत जायचं ही प्रतारणा आहे,” असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 2:01 pm

Web Title: will bjp again go in alliance with shivsena devendra fadnavis answers scsg 91
Next Stories
1 EXCLUSIVE : भाजपाला सत्तेचा उन्माद टीकेवरुन फडणवीस पवारांवर बरसले, म्हणाले…
2 अमानुष कृत्य : क्षुल्लक कारणावरून कुऱ्हाडीचे वार करून उंटाला केलं ठार
3 EXCLUSIVE: होय, आहे मी ब्राह्मण; पवारांना माझ्या जातीबद्दल बोलावं लागतं यातच माझं यश: फडणवीस
Just Now!
X