भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवरून टीका केल्यानंतर, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आता आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.  चंद्रकांत पाटील यांनी पाच वर्षात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना केलेल्या रस्ते प्रकल्पांच्या कामाची चौकशी करणार असल्याचा इशारा मुश्रीफ यांनी आज दिला.

महाविकास आघाडी सरकारने एकाही अधिकाऱ्याची बदली केली नाही. उलट भाजपाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊनच आम्ही काम करत आहे. याउलट भाजपच्या काळामध्ये बांधकाम, जलसंपदा व इतर विभागांमध्ये झालेल्या बदल्यांच्या दारावरून आजही अधिकारी खमंग चर्चा करीत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात कोट्यावधीहून पैसे खर्च करून ‘हॅड्री ॲल्युमिनियमचे’ चार रस्ते प्रस्तावित केले. ते अजूनही पूर्ण झालेले नाहीत. या कंत्राटदारांच्या मी अनेकदा बैठका घेतल्या. उलट त्या प्रकल्पाचे कंत्राटदार मंत्रालयात आम्हाला प्रकल्प खर्चा पेक्षा अधिकचा खर्च करावा लागल्यामुळे कंबरडेच मोडले आहे, अश्या व्यथा सांगत आहेत, असा आरोप मुश्रीफ यांनी केला. त्यामुळे मी बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांना राज्यभरात अशा रस्ते कामांची चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी करीत असल्याचेही ते म्हणाले.