दारूबंदीच्या निर्णय होताच जिल्हय़ातील दारू विक्रेत्यांनी लगतच्या नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला जिल्हय़ांसह ठाणे, मुंबई व नाशिक शहरात दारू दुकानांसाठी जागा शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. अनेक मद्यसम्राटांनी नागपुरात जागा विकत घेतली असल्याची माहिती आहे. दरम्यान, यवतमाळ, भंडारा व गोंदियात जमिनीच्या किमतीत वाढ झाली आहे.
राज्य शासनाने मंगळवारी चंद्रपूर जिल्हय़ात संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे जिल्हय़ातील दारू विक्रेत्यांची दुकाने बंद होऊन संपूर्ण व्यवसाय ठप्प होणार आहे. शासनाने दारूबंदीचा निर्णय घेतला असला तरी बियर बार व बियर शॉपी वगळता देशी व विदेशी दारूची दुकाने राज्यातील अन्य जिल्हय़ात स्थलांतरित करता येणार आहे. शासनाच्या परवानगीनंतर ही दुकाने दारू विक्रेत्यांना ज्या जिल्हय़ात हवी तिथे स्थलांतरित करता येणार आहेत. बंदीच्या या निर्णयाचा निषेध करतांनाच जिल्हय़ातील लिकर लॉबीने राज्यातील इतर जिल्हय़ांत जागेचा शोध घेण्याची मोहीम युध्दपातळीवर हाती घेतली आहे. या जिल्हय़ात देशी दारू विक्रीचे हरीश वाईन एजन्सी, पूजा व मनोहर ट्रेडिंग कंपनी, अग्रवाल एजन्सी, श्री ट्रेडिंग कंपनी असे पाच ठोक विक्रेते आहेत. तर चिल्लर देशी दारूची १०६ दुकाने आहेत. विदेशी दारू ठोक विक्रीची तीन दुकाने आहेत. देशीविदेशी दारूचे २४ दुकाने आहेत. या सर्वाची दुकाने स्थलांतरित करण्यासाठी पहिली पसंती यवतमाळ या जिल्हय़ाला आहे.
गेल्या साडेचार ते पाच वर्षांपासून श्रमिक एल्गारच्या माध्यमातून दारूबंदी आंदोलन सुरू होते. त्यामुळे केव्हाही दारूबंदी होऊ शकते हे लक्षात ठेवून दारूविक्रेत्यांनी चंद्रपूर-यवतमाळ जिल्हय़ाच्या सीमेलगत यवतमाळ जिल्हय़ातील नायगाव, वणी, बेला, मारेगाव, मुळगव्हाण येथे जागा खरेदी करून ठेवली आहे. अनेकांनी नागपूर जिल्हय़ात बुटीबोरी, बेला, सिर्सी, मेडिकल कॉलेज चौक, काटोल, सावनेर, कळमेश्वर, कामठी येथे जागा खरेदी केलेल्या असल्याची माहिती आहे. गोंदिया व भंडारा जिल्हय़ांतही अनेकांनी जागा खरेदी केलेल्या आहेत. चिमूर तालुक्यातील काही दुकाने उमरेड व परिसरात स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. एका बडय़ा दारूविक्रेत्याचे मूळ गाव अमरावती आहे. या विक्रेत्याने अमरावती येथे दुकान परवाना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न चालविणार असल्याची माहिती आहे. या विक्रेत्याने अमरावती, यवतमाळ, अकोला व जळगाव येथे जागा खरेदी करून ठेवली आहे. काही विक्रेत्यांनी मुंबई, ठाणे, नाशिक, पनवेल भागातही दुकाने सुरू करण्यासाठी प्रयत्नात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.